होमपेज › Kolhapur › वृत्तपत्र विक्री स्टॉलवर झाड पडून विक्रेता मृत्युमुखी

वृत्तपत्र विक्री स्टॉलवर झाड पडून विक्रेता मृत्युमुखी

Last Updated: Jun 01 2020 1:52AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

टाकाळा चौकातील वृत्तपत्र विक्रीच्या स्टॉलवर गुलमोहराचे झाड कोसळून सुरेश महादेव केसरकर (वय 60) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. टाकाळा येथील कोरगावकर ट्रस्टच्या जागेवर असणार्‍या पत्र्याच्या शेडवजा घरात केसरकर कुटुंब राहण्यास होते. वार्‍याने येथील झाड उन्मळून शेडवर कोसळले. यामध्ये केसरकर यांची पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाल्या. 

केसरकर दाम्पत्य अंध असल्याने गोविंदराव कोरगावकर ट्रस्टने त्यांना वृत्तपत्र स्टॉल चालविण्यासाठी हिंद कन्या छात्रालयाशेजारी जागा दिली होती. सुरेश केसरकर यांनी येथे पत्र्याचे शेड उभारले होते. शेडमध्येच पत्नी व मुलीसोबत ते राहत. पेपर विक्री व दूध विक्रीतून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. रविवारी सायंकाळी ते शेडमध्ये झोपलेले असताना शेजारील गुलमोहराचे जुने झाड उन्मळून शेडवर कोसळले. त्यात केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारीच असणारी त्यांची पत्नी चिऊताई व मुलगी संस्कृती यांना किरकोळ दुखापत झाली. 

झाड कोसळल्याचा आवाज ऐकून नागरिक मोठ्या संख्येने जमले. दूध घेण्यासाठी आलेले रिक्षाचालक जितेंद्र शिंदे शेडपासून काही अंतरावरच होते. त्यांनी तत्काळ जखमींना बाहेर काढले. तसेच अग्‍निशमन दलाला वर्दी दिली. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी फांद्या कापून झाड बाजूला केले. शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, केसरकर माय-लेकीला मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.

३० वर्षांपासून वृत्तपत्र विक्री

केसरकर दाम्पत्य अंध असूनही  वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात 30 वर्षांपासून होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आवाज देऊन महत्त्वाच्या बातम्या सांगून ते वृत्तपत्र विक्री करीत असत. ग्राहकाने मागितलेले वृत्तपत्र अचूकपणे देण्याची केसरकर यांची खासियत होती. या अंध दाम्पत्याच्या चिकाटीबाबत अनेकांना कुतूहल होते. त्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणूनही भागातील अनेकजण आवर्जून त्यांच्या स्टॉलवरूनच पेपर व दूध घेत होते, असे स्थानिकांनी सांगितले.