Mon, Sep 24, 2018 11:42होमपेज › Kolhapur › रिक्षाचालक सेनाध्यक्ष, पुत्राला सक्‍तमजुरी, दंड

रिक्षाचालक सेनाध्यक्ष, पुत्राला सक्‍तमजुरी, दंड

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 16 2018 1:45AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

वाहन पार्किंग वादातून शिवाजी पेठ येथे दोघांवर खुनी हल्लाप्रकरणी  रिक्षाचालक  सेनेचा अध्यक्ष राजेंद्र शंकर जाधव (वय 48) व त्याचा पुत्र तेजस (22, रा. चंद्रेश्‍वर गल्ली, शिवाजी पेठ) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एल. डी. बिले यांनी सोमवारी दोषी ठरवून सक्‍तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली.

8 ऑक्टोबर 2013 मध्ये शिवाजी पेठ येथील ब्रह्मेश्‍वर मंदिराजवळ लोखंडी पाईप व धारदार हत्यार्‍याने केलेल्या हल्ल्यात प्रवीण उत्तम पोवार (34) व किरण जयवंत पोवार (43, रा. शिवाजी पेठ) जखमी झाले होते. जाधव पिता-पुत्रासह तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. सरकारी पक्षामार्फत सरकारी अभियोक्‍ता विक्रम बन्‍ने यांनी कामकाज पाहिले. खटल्यात 14 साक्षीदार तपासण्यात आले. जखमी प्रवीण पवार, किरण पवार, फिर्यादी संदीप उत्तम पवार यांच्यासह साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने राजेंद्र जाधव याला 5 वर्षे सक्‍तमजुरी, 10 हजारांचा दंड व तेजस जाधवला एक वर्षे साधी कैद व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. खटल्याच्या निकालाकडे शहराचे लक्ष लागून राहिले होते.