Wed, Jul 24, 2019 12:25होमपेज › Kolhapur › बाजारात भाज्यांची आवक वाढली

बाजारात भाज्यांची आवक वाढली

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:01AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरात सर्वत्र संक्रांत सणाची तयारी सुरू झाली आहे. मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. हंगामात येणार्‍या सर्व भाज्या, धान्य यांचा अस्वाद घेण्याची प्रथा आहे. शनिवार, दि. 13 जानेवारी रोजी साजर्‍या होणार्‍या भोगीसाठी शहरातील भाजी मंडईत भाज्यांची आजपासूनच रेलचेल झाली होती. हरभरा, वाटाणा, वांगी, वरणा, शेंगदाणे, कांद्याची पात, गाजर, मेथी आदी भाज्यांच्या राशी बाजारात लागल्या होत्या.यावर्षी वांगी, वरणा व हरभरा आवक चांगली झाल्याने भाज्यांचे दर आवाक्यात होते. याशिवाय संक्रांतीसाठी गूळ, तीळ, बाजरीचे तयार पीठ आदी वस्तूंनाही मोठी मागणी होऊ लागली आहे. 

भोगीच्या बाजारात बाजरी, राळ्याचे तांदूळ, गाजर, वाटाणा, वरणा, वांगी, हरभरा,पातीचा कांदा यासह अन्य भाज्यांची वर्णी लागली आहे. बाजारात बाजरीचे तयार पीठ विक्रीसाठी उपलब्ध आहे. भोगीच्या बाजारातील साहित्याचे किलोचे दर. बाजरी 24 रुपये किलोने विक्रीस उपलब्ध आहे. तर गाजर 20 ते 25 रुपये किलो, वरणा 30 रुपये किलो, कांदापात 15 रुपयांना 2,  मोठ्या वाटाण्याच्या शेंगा 20 रुपये किलो तर जवारी वाटाणा 100 रुपये किलो होता. 

वांगी 40 रुपये किलो, मेथी 10 रुपये पेंढी, हरभरा 10 रुपयांना  एक पेंढी आणि पंधरा रुपयांना 2 प्रमाणे विक्री केला जात होता. तीळ 140 रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहेत. सुवासिनी सुगडामध्ये हंगामातील भाज्या, धान्य घालून वसा पूजन करतात. आज ताराबाई रोड, महाद्वार, शहरातील कुंभार गल्ल्या व भाजी मंडईतही सुगड विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सुगड खरेदीसाठी महिलांनी कुंभार गल्‍लीत मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी सुगड रंगवून विक्री केल्या जात होत्या. 

आज सुगड 20 रुपयांना विक्री केली जात होती. संक्रांत या सणाची गोडी वाढवणारे तिळगुळांनी बाजारात गर्दी केली आहे. मोठे तिळगूळ 60 रुपये किलो तर बारीक तिळगुळ  80 रुपयांनी विक्री केले जात आहेत. याशिवाय तिळाचे लाडू, रेवडी, तिळाची वडी असे पदार्थ जे पूर्वी केवळ घरी बनवले जायचे तेही आता मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आले आहेत.