Fri, Sep 21, 2018 15:14होमपेज › Kolhapur › भाजी विक्रेत्याच्या मुलीची यशाला गवसणी

भाजी विक्रेत्याच्या मुलीची यशाला गवसणी

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:18AMइचलकरंजी : शरद सुखटणकर

अठरा विश्‍व दारिद्य्र पाचवीला पुजल्यामुळे आई-बापाने शाळेचे तोंडही पाहिले नाही. मात्र मुले शिकून मोठी व्हावीत यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी ठेवली. मुलीने पोलिस खात्यात भरती होवून अधिकारी व्हावे ही वडिलांची इच्छा होती. आई-वडील अशिक्षित असताना मुलीने मोठे व्हावे, या प्रेरणेतून अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. ही यशोगाथा आहे एस.टी. प्रवर्गात मुलींमध्ये राज्यात पाचव्या क्रमांक आलेल्या इचलकरंजीतील पूजा कोंडिराम शिंदे हिची. 

लातूर हे पूजाचे आजोळ. 20 ते 25 वर्षांपूर्वी कामानिमित्त पूजाचे आई-वडील इचलकरंजीत स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात एका फौंड्रीमध्ये काम करीत पूजाच्या वडिलांनी कुटुंबाची जबाबदारी पेलली. तोकड्या पगारात तीन मुली व एक मुलगा यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलताना कोंडिराम शिंदे यांची अक्षरश: ओढाताण व्हायची. नोकरीपेक्षा छोटासा व्यवसाय करावा असा विचार त्यांच्या मनात नेहमीच घोळायचा आणि त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून थोडाफार पैसा मिळू लागला. मात्र सगळी मिळकत मुलांच्या शिक्षणावरच खर्च होत होती. मात्र, कोंडिराम कधीही डगमगले नाहीत. वडिलांची इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचीच या ध्येयाने पूजाने द्वितीय वर्षापासूनच राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. कष्ट, जिद्द आणि चिकाटी असेल तर अपयश जवळही येणार नाही याची खात्री पूजाला होती. स्वत:ला ओळखण्याची क्षमताही होती. त्यामुळे परिस्थितीचा बाऊ न करता तिने अभ्यास सुरूच ठेवला. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात पूजा ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. एस.टी.प्रवर्गात तिने मुलींमध्ये राज्यात पाचवी येण्याचा बहुमान मिळवत इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मुलीने आत्मपरीक्षण करून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने कष्ट केल्यास यश हमखास मिळते, असा आशावाद तिने बोलून दाखवला.

पूजाचे प्राथमिक शिक्षण अशोका हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात झाले आहे. पूजा ही वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. कोंडिराम यांची मोठी मुलगी सोनाली द्विपदवीधर तर सीमा व सचिन हेही पदवीधर असून ते दोघेही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करीत आहेत.