होमपेज › Kolhapur › वेदगंगा-दुधगंगेचे पाणी १८ दिवसानंतर नदीपात्रात 

वेदगंगा-दुधगंगेचे पाणी १८ दिवसानंतर नदीपात्रात 

Published On: Aug 14 2019 6:04PM | Last Updated: Aug 14 2019 5:40PM

 वेदगंगा-दुधगंगा पाणी पातळीत घटभडगाव : प्रतिनिधी

तब्बल तीन आठवडे कोसळलेल्या दमदार पावसाने कागल तालुक्यातील वेदगंगा आणि दुधगंगा नद्या महापुराच्या विळाख्यात सापडल्या होत्या. २८ जुलैपासून या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ झाली. यामुळे नदी काठावरच्या हजारो एकर पिकांना जलसमाधी मिळाली. आता नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली असून तब्बल १८ दिवसानंतर वेदगंगा व दुधगंगा या दोन्ही नद्याच्या पाण्याचा प्रवाह नदीपात्रातून सुरू झाला आहे.          

कागल तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या या दोन्ही नद्या आहेत. त्यामुळे या नदीलगतच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बागायत शेती आहे. परंतु तीन आठवडयाच्या महापूराने ऊस आणि भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली असून सखल भागात काही प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. तर हिरवेगार ऊस आणि भात पिकांवर लाल भडक चिखलाचा थर साचला आहे. तर काही ठिकाणी ऊस उन्मळून पडले आहेत. शेतशिवारातील अनेक ठिकाणचे बांध पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. काही ठिकाणी शेतीतील बांधाना भगदाड पडले आहे. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 

याशिवाय पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा, छोटी-मोठी झाडे -झुडपे देखील अनेक भागात अडकली आहेत. पाणी पातळी घटल्याने पिकांचे झालेले नुकसान पाहून बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. तसेच झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.