होमपेज › Kolhapur › वारणा योजनेच्या कामाला मुहूर्त कधी?

वारणा योजनेच्या कामाला मुहूर्त कधी?

Published On: Feb 12 2018 1:53AM | Last Updated: Feb 11 2018 11:12PM
इचलकरंजी : वार्ताहर

कृष्णा नळपाणी योजना गळतीच्या गर्तेत सापडली आहे तर पंचगंगेला प्रदूषणाचे ग्रहण कायम आहे. त्यामुळे वेगाने विस्तारणार्‍या इचलकरंजी शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वारणा नळपाणी योजनाच सक्षम पर्याय आहे. शुद्ध व मुबलक पाण्यासाठी मंजूर झालेल्या या योजनेकरिता आता प्रभागा-प्रभागातून आवाज उठवून वज्रमूठ बांधण्याचे काम शहरात गतीने सुरू आहे. त्याला शहरवासीयांच्या मोठ्या पाठबळाची गरज आहे. 

वारणा योजनेला होत असलेल्या विरोधाची धार कमी करून सामंजस्यातून मार्ग काढण्यासाठी तातडीने प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इचलकरंजी शहरासाठी पूर्वी केवळ पंचगंगा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे शहराची ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था बनली. पंचगंगेला पर्याय म्हणून मोठ्या संघर्षानंतर कृष्णा नळपाणी योजना कार्यान्वित झाली. कृष्णेच्या पाण्यामुळे शहरवासीयांच्या पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची चिन्हे असतानाच ही योजनाही गळतीच्या गर्तेत सापडली.

कृष्णा योजनेला वारंवार लागणार्‍या गळतीमुळे ही योजना ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ बनली आहे. कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजना कुचकामी ठरत असल्यामुळे शहरातील पाणी टंचाईला पर्याय म्हणून वारणा नदी उद्भव धरून अमृत अभियानांतर्गत वारणा नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. 

इचलकरंजी शहराची लोकसंख्या जवळपास चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराला दररोज किमान 54 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज भासते. कृष्णा व पंचगंगा योजनेतून सध्या 35 दशलक्ष लिटर्स पाणी उपसा करून तो शहरासाठी पुरवला जातो. त्यामुळे शहरवासीयांची दररोजची तहान मात्र कायमच आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वारणा योजना पूर्ण होणे व सक्षमपणे राबवणे गरजेचे बनले आहे. इचलकरंजी शहराची 2049 सालची प्रस्तावित लोकसंख्या गृहित धरून अमृत अभियानांतर्गत 68.68 कोटी रुपये खर्चाची वारणा नळपाणी योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी वारणा (चांदोली) धरणातील 1 टीएमसी पाणीही आरक्षित करण्यात आले आहे. वारणा योजनेसाठी आवश्यक जलवाहिनी खरेदीच्या कामाचीही प्रक्रिया पालिकेकडून पूर्ण करण्यात येत आहे. 

वारणा योजना इचलकरंजीबरोबरच वारणा काठच्या नागरिकांसाठीही लाभदायक ठरणारी असताना ही योजना मात्र प्रारंभापासूनच वादग्रस्त बनली आहे. वारणा काठावरील नागरिकांनी विविध मागण्या प्रलंबित असल्याने तसेच सिंचनाच्या प्रश्‍नावरून इचलकरंजीला पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. दानोळीकरांची समजूत काढून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत प्रयत्न झाला. त्याचबरोबर मंत्रीस्तरावरूनही मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थिती पाणी देणार नाही, अशी भूमिका वारणाकाठच्या नागरिकांनी घेतली आहे. 
शहराचे विस्तारीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी वारणा योजनाच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आता इचलकरंजी शहरातही या योजनेच्या पाठपुराव्यासाठी शहरवासीय एकत्र येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता प्रभागवार बैठकाही सुरू झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 22 मधून पाण्यासाठी वज्रमूठ बांधणीला प्रारंभ करण्यात आला आहे. कोणताही संघर्ष होऊ न देता हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या जनजागृतीला आता शहरवासीयांनीही तितक्याच तळमळीने साथ देणे गरजेचे आहे. 

वारणा योजना पूर्ण होण्याबरोबरच वारणा काठच्या गावांतील प्रलंबित मागण्यांची तड लागणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे वारणा योजनेला होत असलेली विरोधाची धार कमी करून सामंजस्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.