Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Kolhapur › ‘वारणा’साठी निधी आणण्यात माझाही हात : खा. शेट्टी

वारणा साठी निधी आणण्यात माझाही हात : खा. शेट्टी

Published On: Feb 28 2018 1:41AM | Last Updated: Feb 28 2018 1:29AMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजीवासीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या वारणा नळपाणी योजनेसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी माझेही योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो उदो करून माझ्या विरोधात रान उठवून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. या योजनेला माझा विरोध नाही. उलट दानोळीकरांचा विरोध कमी करण्यासाठी माझे गतीने प्रयत्न सुरू असून त्यामध्ये लवकरच यश मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रत्येक वक्‍तव्याचा समाचार घेणे मला दखलपात्र वाटत नसल्याचेही शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खासदार फंडातील स्थानिक विकास निधीतून शहरातील 27 शाळांना संगणक प्रदान व विविध 96 ठिकाणी कूपनलिका खुदाई प्रारंभाच्या निमित्ताने  आयोजित कार्यक्रमात खा. शेट्टी बोलत होते. इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी वारणा योजना निश्‍चितपणे मार्गी लावू. दानोळीकरांचा या योजनेला विरोध आहे. मात्र, त्या विरोधामागची अडचण समजून घेण्याची गरज आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शासकीय अधिकार्‍यांनी दानोळीकरांना योजनेसंबंधी वस्तुस्थिती पटवून देऊन गैरसमज दूर करण्याचे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. विजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनील पाटील, शशांक बावचकर, राजू बोंद्रे, जयकुमार कोले, सौ. शुभांगी शिंदे, सावकार मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आदी उपस्थित होते.