Tue, Mar 19, 2019 11:50होमपेज › Kolhapur › ब्लॉग : वारीत मिळतो सेवा अन् दातृत्वाचा मूलमंत्र..!

ब्लॉग : वारीत मिळतो सेवा अन् दातृत्वाचा मूलमंत्र..!

Published On: Jul 15 2018 12:27PM | Last Updated: Jul 15 2018 12:27PMकोल्हापूर : मधुकर भोसले

‘हे विश्‍वची माझे घर’ असं माऊलीनी म्हंटले आहे. सध्याच्या गतीमान व मतलबी युगात कित्येकजण ‘घरच माझे विश्‍व’ या संकल्पनेत मग्न असतात. आत्मकेंद्रीपणा व स्वार्थ वाढत चालला आहे. हे जरी खरे असले व कुणासाठी पाच मिनिटे वेळ देण्याइतपतही औदार्य नसले तरी वारी मात्र त्याला अपवाद आहे. समत्व हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ही समता तसेच दातृत्व व सेवेचा मुलमंत्र वारीत याची देहा याची डोळा व याची ‘करा’ अनुभवता येतो. ‘देणार्‍याचे हात हजारो’ हे ब्रीद इथे पदोपदी जाणवते. आर्थिक, वस्तू या दानाबरोबरच सेवेचे दानही इथे मोठे असते.

वारीच्या वाटेवर देहभान होवून चालणे भाग्याचे पण ज्यांना ही वारी करणे शक्य नाही असे लाखो लोक वारीच्या वाटेवर चालणार्‍या पावलांची विविधांगी सेवा करून पुण्यपदरी जोडण्याचा प्रयत्न करतात. जगात देण्यासारखा दूसरा आनंद नाही हा अनुभव देखील हे दान करणारे घेतात. आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ते पंढरपूरात हा सोहळा विसावण्यापर्यंत वारीच्या वाटेवरील रहिवाशी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात लोक सेवेसाठी वारीत एखाददुसरा दिवस सहभागी होतात.

पुण्यात जेंव्हा माऊली व तुकोबांच्या पालख्या दाखल होतात तेंव्हा अवघी पुण्यनगरी भारावून जाते, मंत्रमुग्ध होते. या सोहळ्यातील वारकर्‍यांची कोणती सेवा करू या आनंदात पुणेकर दंग असतात. वारकर्‍यांना छत्र्या, रेनकोट, चप्पल, पोषाख, हरिपाठ, अभंगाची पुस्तके, टाळ, भक्तगीतांच्या कॅसेटस्, मेवा, मिठाई, खोबरेल तेल याबरोबरच अन्नदानही मोठ्या प्रमाणात केले जाते. हा देण्याचा वसा पुढील पूर्ण मार्गातही लोक जपतात. प्रसादाचा शिरा, चहा, दूध, शुध्द पाणी, भोजनानंतरचा पानविडा अशा प्रकारे काय देवू अन् काय नको असे देणार्‍यांना होते. एरव्ही व्यवहार सांभाळणारी माणसं वारीच्या वाटेवर मात्र मुक्तहस्ते वारकर्‍यांना देत असतात.

अनेक सेवाभावी संस्था आरोग्याची जबाबदारी उचलतात. फिरते दवाखाने, औषधालये पूर्ण तीन आठवडे चालवतात. यामध्ये एक रूपयाही फी घेतली जात नाही. अनेक ठिकाणी लोक थकल्या भागल्या वारकर्‍यांचे पाय दाबून, त्यांना मॉलिश करून या पावलांचा शीणभाग हलका करण्याचा प्रयत्न करतात. अनेक शाळा, महाविद्यालये किंवा तरूणमंडळांचे कार्यकर्ते, विद्यार्थी - विद्यार्थिंनी पालखी दर्शनासाठी ते रांग लावण्याचे किंवा संयोजनाचे मनुष्यबळ आवश्यक असते ते मनोभावे पुरवतात. 

‘सेवाधर्मी पुण्य आहे, सांगे सखा श्रीहरी!’ या तसेच सेवे एवढे पुण्य नाही ज्ञान, ध्यान अन् वैराग्यासही॥ या संतवचना प्रमाणे वारीत सेवेचे रामायण अनुभवता येते. अनेक ठिकाणी तर माऊलींच्या समोर पायघड्या घातल्या जातात. याबरोबरच अनेक दात्यांनी गावोगावच्या दिंड्यांना कायमस्वरूपी भेट म्हणून जनरेटर, स्पीकर सेट, गॅस शेगड्या, तंबू आदी साहित्य देण्यात धन्यता मानली आहे. त्याचबरोबर प्रतिवर्षी दिंडीसाठी लागणारी ट्रॅक्टर, ट्रकसारखी वाहने देखील वाहन मालक मोबदला न घेता पुरवतात. अशा प्रकारे दातृत्व व सेवेचा संगम वारीत पाहताना वारकर्‍यांचे अंत:करण भरून येते.

Image may contain: one or more people, people sitting, people eating and food

केंद्र शासनाच्या एका महत्त्वाच्या विभागात कार्यरत असणारे मुंबई येथील भारत सेवाश्रम संघाचे 25 माऊली भक्त  दहा वर्षांपासून गॅस, रॉकेल वितरण, वाहतूकीचे नियोजन चोपदारांकडून देण्यात आलेल्या सुचना व संदेशांचे प्रसारण आदी विविध कामे अत्यंत मनोभावे करतात. राजाभाऊ व रामभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलीसोबत काम करताना मिळणारा हा वारीतला आनंद वर्षभर आम्हाला सकारात्मक जगण्याची उर्जा देतो, अशी प्रतिक्रीया या पथकातील सुरेश पवार यांनी दिली. यंदा ही टीम आम्ही वारकरी या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. असे अनेक लोक, समूह, सेवाभावी मंडळे, संस्था वारीच्या वाटेवर भेटतात त्या सेवा करून निखळ आनंद मिळवण्याच्या प्रयत्न करीत असतात.