Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Kolhapur › वृक्ष जगवण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करा : चंद्रकांत  पाटील 

वृक्ष जगवण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करा : चंद्रकांत  पाटील 

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यात आतापर्यंत 7 कोटी झाडांची लागवड झाली आहे. यंदा 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावली जातील. झाडे लावण्याबरोबरच ती जोपासण्याची आणि टिकवण्याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी. झाडे लावल्यावर पाण्याची सोय आहे, असे बोलायचे बंद करा. त्याऐवजी ठिबक सिंचन, शेततळे, बोअरिंग तसेच पाण्याचे साठे करून झाडांना पाण्याची सोय करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी येथे  केले.

वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यंदाची वृक्ष लागवड मोहीम  तसेच स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते शेंडा पार्क परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक,  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, वन संरक्षक अरविंद पाटील, राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता गजानन खोत, उप वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, विभागीय वनअधिकारी दीपक खाडे, कृषी सहसंचालक उमेश पाटील आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, दिवसेंदिवस कमी होत चाललेली वृक्षसंपदा ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यात पर्यावरण रक्षणासाठी किमान 400 कोटी झाडे लावणे गरजेचे आहे, असे तज्ञांचे मत आहे.

त्यामुळे राज्य शासनाने 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला आहे. वृक्ष लागवड जितकी महत्वाची आहे, तितकेच महत्त्वाचे हे वृक्ष जगविणे  आहे.  वृक्ष संवर्धनासाठी संपूर्ण समाजाने सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने जागा मिळेल तेथे वृक्षारोपण करावेत. गेल्या वर्षी वृक्षारोपण मोहिमेंतर्गत लावलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाणही 90 टक्क्यापर्यंत आहे. शेंडा पार्क परिसरात 36 हेक्टर क्षेत्रात 40 हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने जांभूळ, निलमोहर, आंबा, आवळा, करंज, रिठा अशा स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात वृक्षारोपणाची मोहीम अधिक गतिमान करून संपूर्ण जिल्हा हरित करण्यासाठी सर्वांनी सक्रिय राहू या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रीन आर्मीच्या सदस्यांनी वृक्षारोपण केले.