कोल्हापूर : प्रवीण मस्के
मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्याने अल्पसंख्याक लोकसमूहातील विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडणार नाहीत. उर्दू माध्यमिक शाळेतील 8 वी ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मराठी भाषा फौंडेशन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणार आहे.
अल्पसंख्याक लोकसमूहाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत शासकीय सेवेतील अल्पसंख्याक उमेदवार, विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी, उमदेवारांना यशाच्या पुरेसा संधी मिळण्याकरिता मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, यासाठी इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये 8 वी, 9 वी आणि 10 वीमध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यापूर्वी ही योजना चालविण्यात येत होती; परंतु 2016 पासून शालेय शिक्षण विभागांतर्गत अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. 1 जुलै ते 31 मार्च असा योजनेचा कालावधी आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 करिता जिल्ह्यातील 17 उर्दू माध्यमिक शाळांमधील सुमारे चार हजार अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी 2 जुलैपासून मराठी भाषा फौंडेशन वर्ग सुरू झाले आहेत.
निरंतर शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हास्तरावर भेटी देऊन मराठी भाषा वर्ग सुरू असल्याची पाहणी होणार आहे. मुख्याध्यापकांकडून दरमहा कार्य अहवाल मागविला जाणार आहे.
व्याकरणासह सारांश लेखन शिकविणार
शिक्षणाधिकारी (निरंतर) यांच्याकडून अल्पसंख्याक माध्यमिक शाळांकडून मानसेवी शिक्षकांचे प्रस्ताव मागवून त्यांची निकषानुसार छाननी होऊन मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 19 मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक क्रमिक पुस्तकाबरोबर विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण, सारांश लेखन, कल्पना विस्तार या गोष्टी शिकविणार आहेत. मानधन म्हणून दरमहा पाच हजार रुपये मानसेवी शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा फौंडेशन वर्ग निरंतर शिक्षण विभागांतर्गत सुरू झाले आहेत. अल्पसंख्याक शाळा समृद्धीसाठी हा उपक्रम फलदायी ठरणार आहे. यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता येणार आहे. - बी. एम. कासार, प्रभारी शिक्षणाधिकारी (निरंतर)