Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Kolhapur › शहरीकरणाचा वेग वाढला!

शहरीकरणाचा वेग वाढला!

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असला तरी शहरीकरणाचा वेग वाढला आहे. नोकरी, व्यवसाय, उद्योग, शिक्षण आदी कारणास्तव शहरी भागातील वास्तव्य वाढत चालले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील 31.73 टक्के लोक शहरी भागातील होते. हा आकडा वाढत चालला असून, येत्या दोन वर्षांत ही टक्केवारी 38 टक्यांपुढे जाईल, असे सांगण्यात येत आहे. जिल्ह्याची लोकसंख्याही 42 लाखांवर गेली आहे. 

जिल्ह्यात 2011 साली जनगणना झाली. त्यानुसार जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख 76 हजार होती. यापैकी शहरी भागात 12 लाख 30 हजार तर ग्रामीण भागात राहणार्‍या लोकांची संख्या 26 लाख 45 हजार 992 इतकी होती. ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे. त्या तुलनेत शहरातील लोकसंख्या वाढीचा दर अधिक आहे. यामुळे गेल्या सहा वर्षांत शहरीकरणाचा वेग काहीसा वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यापूर्वी नागरी भागासाठी एक महापालिका आणि नऊ नगरपालिका होत्या. आता आणखी दोन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरालगतच्या 42 गावांचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शहरीकरणाचा वेेग वाढणार हे स्पष्ट आहे.

जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार 23 शहरात 12 लाख 30 हजार इतकी लोकसंख्या विखुरली होती. यामध्ये आता आणखी एका गावाचा शहर म्हणून समावेश झाला आहे. आता जिल्ह्यातील 24 शहरांत राहणार्‍या लोकांची संख्या येत्या दोन वर्षांत 18 ते 20 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरालगतच्या उचगाव, पाचगाव, उजळाईवाडी या गावातील लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. यामुळे शहराभोवतीही शहरीकरणाचा वेग वाढत चालला आहे.

जिल्ह्यातील 1 हजार 19 कुटुंबे फूटपाथवर राहत असल्याचे 2011 च्या जनगणनेनुसार स्पष्ट झाले आहे. यापैकी बहुतांशी कुटुंबे शहरी भागातील आहेत. या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या या 0.09 टक्के लोकांना स्वत:चे, भाड्याचे अथवा कोणत्याही प्रकारचे घर नाही. ही कुटुंबे शहरातील रस्ते, मैदाने, रिकाम्या जागा आदींचा निवार्‍यासाठी वापर करत असल्याचेही 2011 च्या जनगणनेत स्पष्ट करण्यात आले होते. आताही बर्‍यापैकी अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात काही वर्षांत स्त्री जन्म दरात वाढ झाली आहे. मात्र, त्यात शहरातील प्रमाण तुलनेने कमीच आहे. 2001 च्या जनगणनेनुसार 949 असा स्त्री जन्म दर होता. तो 2011 साली 957 इतका वाढला. मात्र, शहरी भागात हे प्रमाण 947 इतके राहिले आहे. यामध्ये गेल्या सात वर्षांत काहीशी वाढ झाली आहे.