होमपेज › Kolhapur › अप्पर लेखापरीक्षकास लाच घेताना अटक

अप्पर लेखापरीक्षकास लाच घेताना अटक

Published On: Dec 11 2017 1:39AM | Last Updated: Dec 11 2017 1:29AM

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक कार्यालयाकडील अप्पर लेखापरीक्षक तानाजी दादू पाटील याला ओम अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षांकडून पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रविवारी रंगेहाथ अटक केली. लेखापरीक्षण अहवाल संस्थेला पोषक ठरेल, असा करून देण्यासाठी पाटील याने लाच मागितली होती. 

ओम अर्बन क्रेडिट सोसायटीने 2016-17 या कालावधीमध्ये लेखापरीक्षणाबाबतचा ठराव केला नव्हता. त्यामुळे तो मुख्य लेखापरीक्षकांकडेही पाठवण्यात आला नसल्याने मुख्य लेखापरीक्षकांनी गडहिंग्लज येथील अप्पर लेखापरीक्षक तानाजी पाटील याची या संस्थेवर लेखापरीक्षक म्हणून नियुक्‍ती केली. पाटील याने संस्थेच्या अध्यक्षांना संस्थेचे लेखापरीक्षण तुम्हाला पोषक असे करून देतो, त्या मोबदल्यात 10 हजार रुपये देण्याची मागणी केली.

10 हजार रुपये न दिल्यास लेखापरीक्षणातून संस्थेला अडचणीत आणेन, संचालकांना नोटिसा पाठवून कारवाई करेन, संस्थेला दिवाळखोरीमध्ये काढून सर्वांची अडचण करून ठेवेन, अशा प्रकारची धमकी देत लाच देण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षांवर दबाव आणला. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. खात्री झाल्यानंतर रविवारी दुपारी 12 च्या सुमारास गडहिंग्लज येथील कार्यालयामध्ये तानाजी पाटील याने पंचासमक्ष पाच हजारांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

ही कारवाई लाचलुचपतचे उपायुक्‍त संदीप दिवाण, पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे, पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर,विष्णू गुरव यांनी केली.