Mon, Mar 25, 2019 09:20होमपेज › Kolhapur › उमलण्याआधीच होतोय ‘त्यांचा’ र्‍हास !

उमलण्याआधीच होतोय ‘त्यांचा’ र्‍हास !

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 1:44AMकोल्हापूर : एकनाथ नाईक

नैतीकतेच्या -अनैतीकतेच्या पलीकडे जाऊन ग्लोबल होत चाललेल्या तरुणाईच्या क्षणिक आकर्षणांमधून जन्म घेणारी कोवळी फुलं उमलण्याआधीच कचरापेटीत किंवा उघड्यावर फेकून दिली जात आहेत. अनैतिक संबंधातून जन्मलेली अर्भके फेकून देण्याच्या वाढत्या घटनांमुळे संवेदनांचीच विल्हेवाट लागण्यास सुरुवात झाली आहे.हे थांबविण्यासाठी युवक-युवतींचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चित्रपटामध्ये कथानकांमध्ये एखाद्या मंदिराच्या किंवा घराच्या पायर्‍यांवर असहाय्य माता नवजात अर्भक ठेवून जात असल्याचे प्रसंग अनेकदा पाहायला मिळते. वास्तवातही तशीच परिस्थिती अद्यापही कायम असून चंगळवादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या तरुणाईच्या हातून घडलेल्या चुकांची शिक्षा या कोवळ्या जीवांना भोगावी लागत आहे. 

कधी अनवधानाने घडलेल्या चुकीमधून तर कधी आवेगाच्या भरात घडलेल्या ‘तशा’ घटनांमधून गर्भधारणा राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे देश-विदेशातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत आहेत. त्यातच उद्योगाच्या द‍ृष्टीने असलेले पोषक वातावरण आणि विविध राज्यांमधून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थिरावणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. 

गेल्या दीड वर्षात कोल्हापूरमध्ये   जिवंत आणि मृत अशी एकूण 20 अर्भके सापडली आहेत. या घटनांची नोंद सीपीआरमध्ये झाली आहे. जी अर्भके सापडलीच नाहीत, अशांची संख्या किती असेल हा संशोधनाचा विषय आहे. नाला, कोंडाळा, ओसाड माळ, ढिगार्‍यावर अशी अर्भके आढळतात. मृत अर्भकाच्या शरीराचे भटके जनावरे व पक्षी लचके तोडतात.

अर्भकांना फेकून दिल्याच्या घटनांमध्ये अद्याप तरी कोणाला शिक्षा झाल्याचे उदाहरण अलीकडच्या काळात समोर आलेले दिसत नाही. जिवंत सापडलेली अर्भके अनाथालयात किंवा सामाजिक संस्थाच्या उबी त्यांना जावे लागते. अर्भकाविषयी घडणार्‍या गुन्ह्यासंदर्भात कलम 313 ते 318 या कलमान्वये गुन्हे दाखल केले जातात.

माता ‘अज्ञात’च

जिवंत किंवा मृत अर्भक सापडल्यानंतर पोलिस अज्ञात मातेविरुध्द गुन्हा दाखल करतात.ही अज्ञात माता कायम ‘अज्ञात’ राहते. तिचा शोध घेण्यात पोलिसांना कधी यश आल्याचे दिसत नाही.जिवंत अर्भक सापडल्यास कलम 217 नुसार आणि मृत अर्भक असल्यास कलम 318 नुसार गुन्हा दाखल केला जातो. या कलमानुसार बारा वर्षांखालील मुलांना बेवारसपणे सोडून देण्यार्‍या माता, पिता अथवा पालकत्व घेतलेल्या व्यक्‍तीला सात वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड या दोन्ही शिक्षा होऊ शकते. तर कलम 318 नुसार दोषींना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ  शकते.

पालक- पाल्यातील दुरावा वाढला

सोशल मिडियामध्ये तरूण -तरूणी गुरफटल्या आहेत.त्यामुळेच पालक आणि पाल्यामध्ये दुरावा वाढत आहे.पालकांनी पाल्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.सोशल मिडियाच्या  अतिरेकी वापराच्या आहारी युवक -युवती जात आहेत.त्यामुळेच अशा प्रकारच्या विपरीत घटना  त्यांच्या कडून होत आहे.त्यासाठी पाल्य आणि पालकांतील सुसंवाद महत्वाचा आहे,असे वैद्यकीय  तज्ञांनी सांगितले.

कुमारी मातांचं प्रमाण वाढतंय 

जिल्ह्यातील काही तरूण पोरं आणि पोरी शरिरीक आकर्षणाला बळी पडत आहेत.क्षणिक सुख मिळविण्याच्या हव्यासापोटी ही पोरं ‘तशा’ माया जालात अडकत आहेत.त्यामुळे कुमारी मातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.

समुपदेशनाची गरज 

गर्भधारणा टाळण्यासाठी सध्या विविध पर्याय उपलब्ध आहेत.पुरुषांच्या कंडोमच्या वापरासोबतच स्त्रियांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तरीही नको असलेल्या गर्भधारणेमधून जन्म घेणार्‍या संततीचे प्रमाण वाढू लागले. चंगळवादी आणि उपभोगवादी वृत्ती याला कारणीभूत असून जबाबदारीचा, जाणिवेचा अभाव हे सर्वात मोठे कारण यामागे आहे. त्यामुळे या घटनांमागील नेमक्या कारणांचा शोध घेऊन तरुणांचे समुदेशन करण्याची गरज आहे.