Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Kolhapur › अनोळखी मेसेज, मेल बिघडवू शकतात ‘पुरा खेल’!

अनोळखी मेसेज, मेल बिघडवू शकतात ‘पुरा खेल’!

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:17AMकोल्हापूर : सुनील कदम

अनेकवळा आपल्या मोबाईलवर कधी ओळखीच्या तर कधी अनोळखी व्यक्तींकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येत असतात. त्याचप्रमाणे इंटरनेटचा वापर करणार्‍यांना अशाच प्रकारचे संदेश मेलद्वारे प्राप्त होत असतात. अनेकवेळेला केवळ कुतूहल म्हणून मोबाईल अथवा संगणक वापरकर्ता अशा मेसेज अथवा मेलशी चाळा करतो, मात्र हे धोकादायक आहे. कारण अशा अनोळखी मेसेज अथवा मेलच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण डाटा हॅक केला जाऊ शकतो.

अनेकवेळा लोक आपली वैयक्तिक माहिती केवळ लक्षात रहात नाही किंवा अन्य कोणत्या तरी कारणाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवत असतात. अनेकदा यामध्ये आयडी क्रमांक, नेट बँकिंग अकाऊंट नंबर, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड नंबर, त्यांचे पासवर्ड, पासपोर्ट नंबर यासह इतरही अनेक अत्यंत खासगी बाबींचा समावेश असू शकतो. याशिवाय आपल्याशी संबंधित लोकांचे फोन नंबर तर हमखास असतात. 

सायबर गुन्हेगारी क्षेत्रातील हॅकर नावाची जमात एखाद्या बनावट किंवा चुकीच्या मेसेजच्या माध्यमातून आपल्या मोबाईल विश्‍वात डोकावण्याचा प्रयत्न करते. असे मेसेज ओपन केले की एखाद्या विशिष्ट पद्धतीचा व्हायरस आपल्या मोबाईलचा ताबा घेतो आणि आपली सगळी वैयक्तिक माहिती विनासायासपणे हॅकरच्या हाताला लागते, ज्याचा वापर करून ही हॅकर मंडळी काहीही करू शकतात. जसे की आपल्या बँक अकाऊंट नंबरचा वापर करून आपल्या खात्यातील पैसे हातोहात लंपास केले जाऊ शकतात, आपल्या डेबिट कार्ड नंबर आणि पासवर्डचा गैरवापर करू  शकतात. एवढेच नव्हे तर मोबाईलधारक दररोज कुणाशी आणि काय संभाषण करतो, याच्यावरही पाळत ठेवली जाऊ शकते. कधी कधी मोबाईलवर मेसेज येतो की, तुमच्या मोबाईल नंबरला अमूक इतक्या रकमेचे बक्षीस लागले आहे,  ते मिळविण्यासाठी अमूक नंबरच्या खात्यावर अमूक इतकी रक्कम भरा. मात्र, अशा स्वरूपाचे मेसेज म्हणजे सायबर गुन्हेगारांनी लावलेला सापळाच असतो. आजपर्यंत हजारो लोक या असल्या सापळ्यात अडकून लुबाडले गेले आहेत.  अशाच पद्धतीने फसव्या मेलच्या माध्यमातून आपल्या संगणक प्रणालीमध्ये व्हायरस घुसवून त्याद्वारे आपली झाडून सगळी माहिती चोरली जाऊ शकते. त्याचा वापर कोणत्याही कारणासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे मोबाईल अथवा संगणक वापरकर्त्यांनी हे असले फसवे मेसेज अथवा मेलच्या नादी न लागलेले बरे. अनोळखी नंबर किंवा अकाऊंटवरून आलेले असले मेसेज अथवा मेल ताबडतोब डिलिट करून टाकणे हेच केव्हाही शहाणपणाचे ठरते. वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवरही अशा स्वरूपाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा कधीही सायबर गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकण्याचा धोका संभवतो. यासाठी अँटिव्हायरस अथवा फायरवॉल प्रणालीचा वापर करून आपली यंत्रणा सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक ठरते.

गुप्तहेर ते गुन्हेगार!
अलीकडे वेगवेगळ्या क्षेत्रातील खासगी गुप्तहेरांच्या कारनाम्यांच्या बातम्या कानी पडत आहेत. या गुप्तहेरांनी अनेकांची वैयक्तिक माहिती गोळा करून त्याचा गैरवापर केल्याचे प्रकार समोर येत आहेत. याप्रकरणी गेल्याच आठवड्यात पोलिसांनी काही खासगी गुप्तहेरांना अटकही केली आहे. हे गुप्तहेर म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून अशा स्वरूपाचे सायबर हॅकरच असतात. हॅकिंगच्या माध्यमातूनच त्यांचे हे उद्योग सुरू असतात. या गुप्तहेरांचे कारनामे बघितल्यास मोबाईल आणि संगणक वापरकर्त्यांना किती मोठ्या प्रमाणात हॅकिंगचा धोका उद्भवू शकतो, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.