Sat, Nov 17, 2018 01:50होमपेज › Kolhapur › सव्वा कोटी हडपणारा मुख्य सूत्रधार दिल्‍लीत

सव्वा कोटी हडपणारा मुख्य सूत्रधार दिल्‍लीत

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:13AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

युनिक ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेडचे बँक खाते हॅक करून सव्वा कोटीच्या रकमेवर डल्‍ला मारणारा मुख्य सूत्रधार दिल्‍लीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. या चौघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दिल्‍लीतील मास्टर माईंडला शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. 

राजीव रंजन कुमार (वय 32, रा. पटना, बिहार), विकास साव ऊर्फ विकास कालू (34, रा. पश्‍चिम बंगाल), मातादिनसिंग सिकरवार ऊर्फ रामबीरसिंग परमार (32, रा. धौलपूर, राजस्थान) यांच्यासह केहकश परविन (31, रा. पटना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 20 नोव्हेंबर रोजी युनिक ऑटोमोबाईल्सचे खाते हॅक करून 1 कोटी 24 लाख 60 हजार रक्‍कम हॅकर्सनी मुंबई, दिल्‍ली, गुवाहाटी, जमशेदपूर, पश्‍चिम बंगालमधील 12 खात्यांवर वर्ग केली . 

राजीव कुमार एमबीए

पटनाच्या राजीव रंजन कुमार याने फायनान्स विषयात एमबीए केल्याचे पोलिसांना सांगितले. दिल्‍लीतील मुख्य सूत्रधारासाठी माहिती पुरविण्याचे काम तो करीत होता. 

साव मुख्य हॅकर

दुसरा संशयित विकास साव ऊर्फ विकास कालू हा खाती हॅक करण्याचे काम करीत होता. भारतातील मोठ्या कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती तो हॅकिंगद्वारे नायजेरीयातील टोळीला कळवत होता. यानंतर ही टोळी खात्यातील गोपनीय पिन नंबर प्राप्‍त करून ऑनलाईन ही रक्‍कम अन्य खात्यांत वळवीत असत. 

खात्याच्या व्यवहारांची माहिती घेऊन डल्‍ला

कंपनीच्या खात्यांची माहिती मिळविताना कोणत्या दिवशी सर्वाधिक रक्‍कम खात्यात येते, याची माहिती विकास साव घ्यायचा. सर्वाधिक रक्‍कम खात्यात आल्याचे समजताच ते हॅक केले जायचे. युनिक ऑटोमोबाईल्सचे खाते हॅक होण्याच्या आधल्या दिवशी असाच प्रयत्न झाला होता. त्या दिवशी खात्यावर केवळ 17 लाख रुपये होते. 20 नोव्हेंबरला 1 कोटी 24 लाखांची रक्‍कम जमा होताच, हा डल्‍ला मारण्यात आला.