Fri, Jan 24, 2020 21:42होमपेज › Kolhapur › शिवडाव घाट रस्त्याला केंद्रीय वन्यजीव विभागाची मान्यता

शिवडाव घाट रस्त्याला केंद्रीय वन्यजीव विभागाची मान्यता

Published On: Jul 18 2019 5:14PM | Last Updated: Jul 18 2019 5:14PM
गारगोटी : रविराज वि. पाटील

गेली 35 वर्षे बहुचर्चेत राहिलेल्या शिवडाव-सोनवडे-मठकुडाळ घाट रस्त्याच्या कामाला मुख्य अडसर ठरलेल्या दिल्ली येथील केंद्रीय वन्यजीव व पर्यावरण विभागाने आज मान्यता दिल्याने घाट रस्त्याचा प्रश्‍न मार्गस्थ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वन्यजीव व पर्यावरण विभागाची परवानगी त्वरीत मिळवून देण्याच्या दिलेल्या आश्‍वासनाची केवळ दोनच दिवसात आज पुर्तता झाली. या घाट रस्त्यामुळे भुदरगड तालुका कोकणला जोडण्याचे स्वप्न लवकरच सत्यात साकारणार आहे. 

या घाट रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आलायमेंटचा (मार्ग रेषा) मुद्दा उपस्थित करून नवे वादळ उभे केले होते. मात्र या घाट रस्त्याच्या आलायमेंटला पुर्वीच मान्यता दिल्याचे वस्तुनिष्ठ वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले होते. आमदार प्रकाश आबिटकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून आलायमेंट मुद्द्याबाबत बैठक आयोजीत करण्याचे कळविले होते. त्यानुसार 16 जुलै रोजी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुर्वीच्या आलायमेंट नुसार रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच नामदार पाटील यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधून नॅशनल बोर्ड ऑफ वर्ल्ड लाईफची परवानगी तातडीने द्यावी अशी मागणी केली होती. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांना 19 जुलै रोजी यावर शिक्का मोर्तब करू असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नॅशनल बोर्ड ऑफ वर्ल्ड लाईफची परवानगी देण्यात आली आहे. या घाट रस्त्यासाठी मुख्य अडसर ठेलेल्या वन्यजीव विभागाची मान्यता ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे.  दुसर्‍या टप्प्याची वनविभागाने मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष घाट रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. 

चंद्रकांत पाटील हे भुदरगड तालुक्याचे सुपूत्र असल्यामुळे त्यांना या घाट रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागावा याबाबत तळमळ होती. केवळ चंद्रकांत पाटीलच या घाट रस्त्याचा प्रश्‍न मार्गस्थ लावतील अशी भुदरगड मधील जनतेची आशा होती. वन्यजीव विभागाच्या मान्यतेमुळे जनतेची आशा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भुदरगड वासीयांमधून चंद्रकांत पाटील यांच्या या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.