Mon, May 20, 2019 22:18होमपेज › Kolhapur › शालेय समितीकडून विद्यार्थ्यांना गणवेश

शालेय समितीकडून विद्यार्थ्यांना गणवेश

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:55PMपरभणी : प्रतिनिधी

सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश निकषात आता बदल झाला आहे. यात नव्याने सुरू केलेली थेट लाभ हस्तांतरणाची अट शिथिल करण्यात आली आहे. चालू वर्षात पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश खरेदी करून ते विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय 28 जूनला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक विशाल सोळंकी यांनी घेतला आहे.

संपूर्ण शिक्षांतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक 2018-19 च्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत 10 मे रोजी मोफत गणवेश योजना अंदाजपत्रकास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिकांना गणवेश योजना अंमलबजावणीसाठी योग्य त्या मार्गदर्शक सूचनाही या परिपत्रकात दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रतिगणवेश 300 रुपये याप्रमाणे दोन गणवेशांकरिता 600 रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनांचे एकद्धत्रीकरण करून 2018-19 या आर्थिक वर्षापासून समग्र शिक्षा अभियान ही नवीन योजना सुरू झाली. यात इयत्ता 1 ली ते 8 वीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीची मुले, दारिद्य्र रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजना लागू केली. प्रतिगणवेश 300 रुपये याप्रमाणे 2 गणवेशांसाठी 600 रुपयांची तरतूद केली. याचा निधी वाटपासाठी विलंब होणार नाही, याची जाणीव लक्षात घेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून नवीन नियमावली तयार झाली आहे. यात पूर्वी प्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीकडून गणवेशाची खरेदी करत ते विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेशित केले आहे. यामध्ये कोणताही पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शाळा व्यवस्थापन समितीवर सुपूर्द करण्यात आली आहे.