होमपेज › Kolhapur › पंचगंगा इशारा पातळीखाली

पंचगंगा इशारा पातळीखाली

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगेच्या पातळीत घट होत आहे. चार दिवसांपूर्वी धोका पातळीच्या वर वाहणार्‍या पंचगंगेची पातळी इशारा पातळीच्या खाली आली. 24 तासांत पंचगंगेची पातळी दोन फुटांनी कमी झाली. आज दिवसभर शहरात पावसाची उघडझाप तर ग्रामीण भागात पावसाचा हलकासा शिडकाव सुरूच होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची संततधार कायम आहे. 

दरम्यान, अजूनही जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली आहेत. चार राज्यमार्ग बंद असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. शिवाजी पुलावरून आजपासून चार चाकी वाहनांची वाहतूकही सुरू झाली. कोल्हापूर-गगनबावडा, कसबा बावडा-शिये या मार्गावरील वाहतूकही आज सुरू झाली. राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून, धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अजूनही सुरू आहेत. 
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. या धरणातून सकाळपर्यंत 24511 क्युसेक विसर्ग होता, तो वाढवून 26 हजार क्युसेक करण्यात आला.  काल (ता. 21) 41 फूट असलेली पंचगंगेची पातळी आज 38 फुटापर्यंत खाली आली. पूर आलेल्या ठिकाणचे पाणी ओसरल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जयंती नाल्याजवळ तर थर्माकोल आणि प्लास्टिकचा खच पुलाजवळ अडकला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 24.89 मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक 93 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. 

पूर ओसरल्याने शेतकरी चिंतामुक्त

गेले आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर ओसरताच पाण्याखाली गेलेल्या पिकांनी मोकळा श्‍वास घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील सर्वच नद्यांना आलेला पूर साधारणपणे पाच दिवस कायम होता. या पुराची पातळी नदीकाठाबरोबरच काही ठिकाणी सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत विस्तारली होती. त्यामुळे या पाण्याखाली ऊस, भातासह अनेक पिके बुडाली होती. अजून दोन दिवस पुराचे पाणी कायम राहिले असते तर ही पिके हातची जाण्याचा धोका होता. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता होती. गेले दोन दिवस पावसाने बर्‍यापैकी विश्रांती घेतल्याने नद्यांचे पाणी गतीने ओसरू लागले आहे. परिणामी पाण्याखाली बुडालेली पिके मोकळा श्‍वास घेऊ लागली आहेत.

अगदीच नदीकाठावर मळीरानात असलेल्या पिकांना मात्र धोका संभवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण काही ठिकाणी गेले आठवडाभर पिके पाण्याखाली होती. उसाच्या सुरळीत पाणी गेल्याने ती कुजल्यास वाढ खुंटणार आहे. तर भात पिके जास्त दिवस पाण्याखाली राहिल्यास ती कुजू लागतात. परिणामी या दोन्ही पिकांना धोका उद्भवू शकतो. कोणत्या भागात पिकांचे किती नुकसान झाले याची माहिती कृषी विभाग घेत आहे, पण अद्याप नुकसानीची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 

ऊन-पावसाचा खेळ

श्रावणाला अद्याप कालावधी असतानाच जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. शनिवारी आणि रविवारीही सकाळपासूनच कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण कोल्हापूर शहर आणि परिसरात होते.

यंदाच्या पावसाळ्यात जून महिना कमी पावसाचा गेला, पण जुलैमध्ये पावसाने चांगली साथ दिली. गेले आठ दिवस सतत पडणार्‍या  पावसामुळे जिल्ह्यातील लहान आणि मध्यम धरणे भरली असून मोठ्या धरणातील पाणीसाठाही 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेले दोन दिवस संततधार पावसाने विश्रांती घेत तो अधूनमधून पडू लागला आहे. त्यामुळे नद्यांना आलेला पूर ओसरू लागला आहे. 
सध्या पाऊस आणि ऊन अशा दुहेरी वातावरणाचा अनुभव येत आहे. पहाटे आणि सकाळी जोरदार पाऊस पडत असला तरी दुपारनंतर ऊन- पावसाचा खेळ सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अल्हाददायक वातावरणातून नागरिकांना दिलासा मिळत आहे. खरीप हंगामातील पिकांनाही हे वातावरण पोषक ठरत आहे.