होमपेज › Kolhapur › आयुक्‍तांवर ‘अविश्‍वास’ कठीण?

आयुक्‍तांवर ‘अविश्‍वास’ कठीण?

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:39PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सतीश सरीकर

सद्यस्थितीत आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी व लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आयुक्‍तांवर अविश्‍वास आणावा, अशी चर्चाही पदाधिकारी व नगरसेवकांत सुरू आहे. परंतु, त्यासाठी पाच अष्टमांश मते आवश्यक आहेत. साहजिकच, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी भाजप-ताराराणी आघाडीची साथ घ्यावी लागणार आहे. मात्र, ठोस कारण असल्याशिवाय त्यांची साथ मिळणार नाही. परिणामी, आयुक्‍तांवरील ‘अविश्‍वास’ अशक्य आहे. 

महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसचे 29 व राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत. विरोधी ताराराणी आघाडीचे 19 व भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. सत्ताधार्‍यांकडे 44 इतके सदस्यबळ असून, शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिल्यास 48 पर्यंत संख्या जाऊ शकते. मात्र, सत्ताधारी व शिवसेनेतही मतमतांतरे आहेत. अविश्‍वास ठराव मंजूर होण्यासाठी 81 पैकी 51 नगरसेवकांची मंजुरी पाहिजे. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नाही. 

महापालिकेतील अनेक फायली प्रलंबित आहेत. त्याला कारण म्हणजे त्यातील त्रुटी. विकासकामे रेंगाळली आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्याला आयुक्‍त जबाबदार नाहीत, तसे नगरसेवकही जबाबदार नाहीत. प्रशासकीय यंत्रणाच अकार्यक्षम बनली आहे. आयुक्‍त फक्‍त त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मनपा यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याने आयुक्‍त ताकही फुंकून पीत आहेत. 

महापालिकेतील निगरगट्ट अधिकारी-कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाची जाणीव करून द्यायची असेल, तर आयुक्‍त चौधरी यांची प्रशासनावरील पकड योग्यच आहे. शहराच्या दुरवस्थेला महापालिकेचे काही अधिकारीही कारणीभूत आहेत. फक्‍त ‘अर्थ’ असलेल्या फायलींतच त्यांना ‘इंटरेस्ट’ असतो. अशा अधिकार्‍यांची आयुक्‍तांसमोर जाताना भंबेरी उडते. प्रामाणिक अधिकार्‍यांना भीतीचे कारण नाही. कुस्ती मैदानाचे चांगले नियोजन केल्याबद्दल आयुक्‍तांनी केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातच सर्वांचे अभिनंदन केले. यावरूनच त्यांना चांगले काम करणारे अधिकारी हवे आहेत, हे स्पष्ट होते.

स्वयंघोषित नगरसेवक 300!

महापालिका सभागृहात 86 नगरसेवक असले, तरी प्रत्यक्षात तीनशेच्यावर इतर स्वयंघोषित नगरसेवक आहेत. नगरसेविकांचे पती, दीर, भाऊ, मुले, सासरे, नातू, नातेवाइकांसह पी. ए. आदींचा त्यात भरणा आहे. त्यांचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप वाढला आहे. महापालिकेतील कामांच्या फायलीही तेच हाताळत असतात. अधिकारी व कर्मचार्‍यांना अरेरावीही करतात. नातेवाइकांच्या लुडबुडीमुळे काम करणे अशक्य होत असल्याचे अधिकार्‍यांचे मत आहे.

अविश्‍वासाची नुसतीच चर्चा

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी अविश्‍वास ठरावाचा उल्‍लेेख केल्यानंतर त्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही मुश्रीफ यांनी जाहीर सभेत तत्कालीन आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्यावर अविश्‍वास ठराव आणावा, असे सांगितले होते. त्यानुसार सत्ताधार्‍यांनी प्रस्तावही तयार केला होता. मात्र, विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने त्यांना साथ दिली नाही. परिणामी, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला अविश्‍वासाचा ठराव गुंडाळावा लागला होता. 

थकबाकीप्रकरणी  21 नळ कनेक्शन बंद

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने 448 थकबाकीदारांवर कारवाई करून 21 जणांची नळ कनेक्शन बंद करण्यात आली. 47 लाख 90 हजार 511 रु. थकबाकी वसूल करण्यात आली. सीपीआर प्रशासनाने 28 लाख थकबाकी भरली. 24 ऑक्टोबर ते 8 डिसेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. अद्यापही पाणीपुरवठा विभागाची सुमारे 20 कोटींहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे.