Tue, Jul 16, 2019 12:18होमपेज › Kolhapur › सरकार चांगले नसेल तर त्याला आपटावेच लागेल : उद्धव ठाकरे

सरकार चांगले नसेल तर त्याला आपटावेच लागेल : उद्धव ठाकरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हातकणंगले : प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची उकल करता न येणारा राजकारणी लोकनेता होऊ शकत नाही. सरकार पाडणे माझा धंदा नाही; परंतु सरकार चांगले नसेल तर त्याला आपटावेच लागेल. याकरिता जनतेच्या न्याय हक्‍कासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. हातकणंगले येथील आमदार सुजित मिणचेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, गरिबांचा पैसा जाहिरातबाजी करण्यासाठी मोदी सरकार वापरत आहे. शासन म्हणते साडेसहा हजार कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले. परंतु, खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न होता ती रक्‍कम कोणाच्या खात्यावर जमा झाली, हे शोधावे लागेल. शेतकरी, व्यापारी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले असताना मोदी मात्र परदेशी दौर्‍यात मग्‍न आहेत. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर 28 टक्क्यांचा जीएसटी 18 टक्के केला. मग इतर राज्यावर अन्याय का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

परिणामी, केवळ जाहिरातबाजी करणार्‍या शासनाला अद्दल घडविण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्योजकांचे व  शेतकर्‍यांचे प्रश्‍न अनुक्रमे गणेश भांबे व अजित पाटील यांनी मांडले. शिक्षण संस्थांना अनुदान देण्याची मागणीही संजय दीक्षित यांनी केली. स्वागत आमदार सुजित मिणचेकर यांनी केले.