होमपेज › Kolhapur › रस्त्यावर उतरा, मी नेतृत्व करतो

रस्त्यावर उतरा, मी नेतृत्व करतो

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जीएसटी, नोटा बंदी, रेरा यामुळे उद्योग डबघाईला आले आहेत.  उद्योग, व्यापार देशोधडीला लावणार्‍यांचा आणखी किती काळ अन्याय सहन करायचा? वेदना तुम्हाला होतात, तर तुम्ही रस्त्यावर उतरा, मोर्चा काढा, मी तुमचे नेतृत्व करतो, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कोल्हापुरात व्यापारी, उद्योजक संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

केंद्र व राज्याच्या वीज व व्यापार विषयक धोरणावर चौफेर टीका करताना ठाकरे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत देशाला एक चांगला चेहरा पाहिजे होता. काँग्रेसकडे तो नव्हता. देशात परिवर्तन  घडवण्यासाठी भाजपसोबत गेलो. प्रचार काळात नरेंद्र मोदींवर कोणी आरोप केले, तर तो माझ्यावर आरोप केल्यासारखे वाटत होते. तेव्हा मी विरोधकांना प्रत्युत्तर देत होतो. निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान झाले. मला वाटले आता जनतेचे प्रश्‍न सुटतील; पण तीन वर्षे उलटली, तरी केवळ आश्‍वासनेच दिली जात आहेत. म्हणून मला त्यांच्याविरोधात बोलण्याची वेळ आली आहे.

ते म्हणाले, राज्यातील उद्योगांची स्थिती बिघडली आहे. एकाच राज्यात विजेचे दर वेगवेगळे आहेत, असे असताना बाहेरचे उद्योग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आहे त्या उद्योगांना आपण योग्य सुविधा देत नाही, मग बाहेरच्या उद्योगांना कशाला निमंत्रण देता? जीएसटीतील जाचक त्रुटींमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. गुजरात निवडणुकीमुळे जीएसटीचे दर काही प्रमाणात कमी केले आहेत; पण ते लवकरच वाढतील. या कायद्याला सर्वात प्रथम मी विरोध केला व यापुढेही तो कायम राहणार आहे. जिथे-जिथे अन्याय होईल, तिथे मी भाजपविरोधात बोलतच राहणार.

भाजप म्हणजे नवसाचं पोर

भाजप म्हणजे नवसाचं पोर आहे, नवसाच्या पोराचे कौतुक करावेच लागते; पण त्यालाही मर्यादा असते. आता हे पोर मोठे झाले आहे. ते पेकाटात लाथ मारायला लागले आहे. त्यामुळे अशा उडाणटप्पू पोराला वठणीवर आणण्याची गरज आहे, असे  ते म्हणाले.

अन्याय तुमच्यावर होत असेल, तर त्याला विरोध करण्याची धमक पाहिजे. तुमची तयारी असेल, तर अन्य जिल्ह्यांतील व्यापार्‍यांना एकत्रित करण्याचे काम मी करतो. जानेवारी महिन्यात मुंबईत बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले. व्यापार्‍यांनी त्याला होकार देत रस्त्यावरची लढाई लढण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी आनंद माने, सदानंद कोरगावकर, चंद्रकांत जाधव, राजू पाटील, सुरजित पवार, अजित कोठारी, महेश यादव, मदन पाटील आदींनी व्यापार, उद्योगांबाबत प्रश्‍न मांडले.

यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खा. विनायक राऊत, गजनान कीर्तीकर, अरुण दूधवडकर, आ. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते.