Thu, Apr 18, 2019 16:24होमपेज › Kolhapur › ब्रिटनच्या तरुणांचा रिक्षातून भारत प्रवास

ब्रिटनच्या तरुणांचा रिक्षातून भारत प्रवास

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यावरणाचा संदेश देत ब्रिटनमधील युवक रिक्षातून भारत भ्रमण करण्यासाठी आले आहेत. हे युवक नागाळा पार्कमधील एका हॉटेलमध्ये सोमवारी वास्तव्यास होते. गेले काही महिने ते रिक्षाने प्रवास करीत भारतातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवत आहेत. याचबरोबर झाडे वाचवा हा संदेशही ते देतात.

दोन रिक्षांमधून जेम्स बर्नहॅम, स्कॉट ब्युकल, सुझान लिव्हिंगस्टोन, ग्रॅब्रिले बर्नहॅम यांनी प्रवासाला सुरुवात केली. ब्रिटनमधील एका पर्यावरण क्षेत्राशी काम करणार्‍या संस्थेचे सक्रिय सदस्य असल्याचे व भारतातील निसर्गसौंदर्य अनुभवणे या प्रवासाचा उद्देश त्यांनी सांगितला. सर्वप्रथम दिल्ली व राजस्थानमधील ठिकाणांना भेटी दिल्या. त्यानंतर केरळमध्ये प्रवेश करीत कोची येथील एका पर्यटन विषयक सेवा देणार्‍या कंपनीकडून भाडेतत्त्वावर रिक्षा घेतली. विविध ठिकाणे पाहिली. त्यानंतर कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. सध्या महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. सोमवारी हे युवक कोल्हापुरात वास्तव्यास होते. कोल्हापुरातील विविध ठिकाणांना भेटही दिली. यानंतर ते गोव्याकडे रवाना होणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत विविध राज्यांत प्रवास करण्याचा त्यांचा मानस आहे.