Mon, Jun 17, 2019 14:35होमपेज › Kolhapur › बिंदू चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला

बिंदू चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जमीन वादातून पोलिस रेकॉर्डवरील सराईतासह साथीदारांना सुपारी देऊन भोई गल्लीतील दोन तरुणांवर बिंदू चौकात सोमवारी भरदिवसा जीवघेणा हल्ल्याचा प्रकार घडला. त्यात विनायक शामराव क्षीरसागर (वय 33), मयूर प्रकाश क्षीरसागर (30) हे सख्खे-चुलतभाऊ गंभीर जखमी झाले. भरचौकातील थरारनाट्यामुळे तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा दोन संशयितांना अटक करण्यात आली.

संशयित बाबासाहेब सदाशिव साळुंखे, गंगुबाई सदाशिव साळुंखे, प्रकाश कांबळे ऊर्फ भाई (रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) याच्यासह सात जणांवर खुनाच्या प्रयत्नासह अपहरण, बेकायदा जमाव करून हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी पत्रकारांना सांगितले. यापैकी गौरव वडर व राडा नामक तरुणाला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे.

गजबजलेल्या मार्गावरून हातात कोयता घेऊन हल्लेखोरांनी पाठलाग केल्याने व्यापार्‍यांसह महिलांची तारांबळ उडाली. या दहशतीमुळे परिसरात बंदसदृश स्थिती निर्माण झाली होती.तरुणावर हल्ला झाल्याची माहिती समजताच भोई गल्लीतील तरुणांचा मोठा जमाव घटनास्थळी दाखल झाल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक बाबर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला.

हल्ल्यात मयूरसह विनायक गंभीर जखमी झाले असून, त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या नातेवाईकांसह भोई गल्लीतील तरुणांनी रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती.पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, क्षीरसागर कुटुंबीयांनी प्रयाग चिखली येथील गंगुबाई साळुंखे याच्या मालकीची 46 गुंठे क्षेत्राची जागा 2012 मध्ये खरेदी केली आहे. या जागेचा क्षीरसागर यांच्याकडे सध्या ताबा आहे. या जागेलगत उर्वरित जागेत बाबासाहेब साळुंखे यांनी शाळेचे बांधकाम केले आहे. उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने क्षीरसागर यांनी खरेदी केलेली जागा पुन्हा मूळमालकाला द्यावी, यासाठी काही महिन्यांपासून तगादा सुरू आहे.जागा परत देण्याच्या मागणीसाठी क्षीरसागर-साळुंखे यांच्यात दोन-तीनवेळा बैठका झाल्या; पण क्षीरसागर बंधूंनी त्यास नकार दिल्याने दोन गटात मतभेद निर्माण झाले आहेत.एकमेकाला खुन्नस देण्याचे प्रकारही घडले आहेत.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला विनायक, मयूर क्षीरसागर बिंदू चौकात बोलत थांबले होते. गौरव वडर, राडा हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी प्रयाग चिखलीतील जागा परत देण्याचा प्रस्ताव मांडला.क्षीरसागर बंधूंनी हा प्रस्ताव फेटाळताच त्यांच्यात जोरात वादावादी झाली. गौरवसह राडा नामक तरुणाने क्षीरसागर यांना उद्देशून, तुला प्रकाश भाईने बोलावले आहे, असे सांगून आमच्या वाहनातून यावे लागेल, असे बजावले. त्यावर क्षीरसागर यांनी नकार दिला. गौरव, राडासह पाच-सहा साथीदारांनी या दोघांना जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षीरसागर यांनी त्यास प्रतिकार केला.

पाठलाग करून हल्ल्याचा प्रयत्न

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विनायक व मयूरने तेथून पलायनाचा प्रयत्न करताच, संशयितांनी पाठलाग करून कोयत्याने दोघांवर हल्ला केला. डोक्यावर, हातावर, पाठीवर वार झाल्याने दोघेही जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरासह सातजणांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुपारी देऊन हल्ल्याचा प्रयत्न

गौरव वडर, राडा व त्याच्या साथीदारांना सुपारी देऊनच क्षीरसागर बंधूंवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गंगुबाई साळुंखे, बाबासाहेब साळुंखे, प्रकाश कांबळे ऊर्फ भाईसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी सांगितले.