होमपेज › Kolhapur › ‘महापारेषण’मध्ये तब्बल दोन हजार पदांना कात्री

‘महापारेषण’मध्ये तब्बल दोन हजार पदांना कात्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील सकटे 

शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या बेरोजगारांना महापारेषण कंपनीने धक्‍का दिला असून, या कंपनीतील तब्बल दीड हजारांवर पदांना कात्री लावली आहे. भविष्यात ही पदे न भरण्याचा निर्णय झाल्याने महापारेषण अधिकारी कर्मचार्‍यांत प्रचंड असंतोष पसरला आहे. महापारेषणनंतर आता महावितरणमध्ये आकृतीबंध लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

महापारेषण कंपनीने नवीन आकृतीबंध स्वीकारला आहे. याबाबतच आदेश नुकताच काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार कंपनीतील एक हजार 726 पदांना कात्री लागली आहे. सध्या कार्यरत असणारी ही पदे भविष्यात न भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सध्या कार्यरत अधिकारी अभियंते कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीने  130 आणि एक हजार 726 पदांना कात्री लावण्याचे दोन स्वतंत्र प्रस्ताव तयार केले होते.

यापैकी 1726 पदे नष्ट करणारा दुसरा प्रस्ताव मंजूर केला.  या प्रस्तावानुसार अतिरिक्‍त कार्यकारी अभियंत्यांची 25, उपकार्यकारी अभियंत्यांची 406, वरिष्ठ यंत्रचालक 923, यंत्रचालक 372 अशी एकूण  तब्बल 1726 पदे नष्ट केली आहेत. या सर्व पदांवरील विद्यमान अभियंते, कर्मचारी कार्यरत असेपर्यंत ही पदे कायम राहणार असून, ही मंडळी निवृत्त होताच पदे नष्ट करण्याचा हा निर्णय आहे. साहायक अभियंत्यांच्या पदांमध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे. महापारेषणच्या सेवेत प्रवेश करणारे पद म्हणून सहायक अभियंता या पदाकडे पाहिले जाते. मात्र, आता वरिष्ठ पदांना कात्री लावल्याने या कंपनीत पदोन्‍नतीचा मार्ग खुंटणार आहे.