होमपेज › Kolhapur › वर्षाला दोन हजार लोकांना सर्पदंश

वर्षाला दोन हजार लोकांना सर्पदंश

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:13AMकोल्हापूर : विकास कांबळे

देशात सर्वाधिक सर्पदंश हे महाराष्ट्रात होत असून त्याला आळा घालण्यासाठी एड्स, पोलिओ आणि मलेरियासारखी जागृती आणि औषधे उपलब्ध करून देण्याची गरज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या देशपातळीवरील संस्थेने व्यक्‍त केली आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा सर्पदंशात आघाडीवर आहे. या जिल्ह्यात 2696 जणांना सर्पदंश झाला आहे. याशिवाय, पालघर 2343, ठाणे 1332, रायगड 1216, जळगाव 1180, पुणे जिल्ह्यात 1081 जणांना सर्पदंश झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात साधारणपणे दोन हजार जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. 

अतिदुर्गम भागात होणार्‍या सर्पदंशावर उपचार करण्यासाठी लसीची उपलब्धता करणे आणि सर्वाधिक सर्पदंश कोणत्या ठिकाणी होतात, त्या जागांचे निश्‍चितीकरण करण्यावर ‘एम्स’ने अहवालात भर दिला आहे.  गेल्या वर्षभरात राज्यात 23,437 जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यात ग्रामीण भागात सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्पदंश झालेल्यांमध्ये  23,437 सर्पदंश ग्रामीण भागातील आहेत. सर्वच जिल्ह्यात शहरी भागात सर्पदंशाचे प्रमाण कमी आहे.

सापांच्या सर्वच जाती विषारी नाहीत, पण त्याला पाहिल्यानंतरच व्यक्‍ती प्रचंड घाबरत असतो. त्यामुळे साप दिसला की अजूनही आपण त्याला पकडून सुरक्षीत ठिकाण सोडण्याऐवजी प्रथम त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे पावसाळा सुरु झाला गवत वाढू लागले की सर्पदंशाचे प्रमाण वाढू लागते. महाराष्ट्रापाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. या राज्यात 23,666 लोकांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. याशिवाय आंध्रप्रदेश 10,735, ओरिसा 7,657 कर्नाटक 7,619, उत्तरप्रदेश 6,976, तामिळनाडू 4,567 व तेलंगणामध्ये 4,079 जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे.

विजेचा अभाव, घनकचर्‍याचे व्यवस्थापन योग्यरित्या न करणे ही सर्पदंशामागे सर्वाधिक कारणे असून त्याबाब जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. उघड्यावर शौचाला बसण्यास पूर्णपणे बंदी घालणे, जमिनीवर झोपणे यामुळे सर्पदंशाचे प्रमाण वाढत आहे. सर्व डॉक्टर्सना सर्पदंश उपचाराबाबत प्रशिक्षण देणे विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्र व छोटी रुग्णालये येथे प्राधान्याने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
गरीबीमुळे दुर्लक्ष
सर्पदंश हा देशातील दुर्लक्षीत असा आजार राहिला आहे. केवळ गरिबी हेच त्याचे कारण आहे. दरवर्षी 19 हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात असा अधिकृत अहवाल असला तरी ही संख्या खूप मोठी असली पाहिजे. कारण ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील अशा मृत्युची आकडेवारी उपलब्ध होण्यात अनेक अडचणी असल्याचे अहवालात म्हंटले आहे. त्याचबरोबर दरवर्षी प्राथमिक आरेाग्य केंद्रातील हेाणार्‍या बदल्या हे देखील एक कारण असल्याचे म्हंटले आहे. या डॉक्टराना सर्पदंश आणि त्यावरील उपचाराची सर्व माहिती असते. काही ठिकाणी उपचाराची साधने नसतात. त्यामुळे उपचारासाठी मोठ्या शहरात नेतानाच प्रवासातच असे रुग्ण मृत्युमुखी पडत असतात. असे राष्ट्रीय विष माहिती केंद्राच्या प्रमुखांनी अहवालात म्हंटले अहे.

केंद्राचा पहिलाच अहवाल

देशपातळीवर सर्पदंशाची आकडेवारी आणि त्यामुळे होणारे मृत्यू याबाबत आरोग्य व्यवस्थापन माहिती केंद्राने प्रथमच अभ्यास करून आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. हा अहवाल देताना याबाबतच्या केसीसची नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्‍त केली असून त्याच्या आधारे सर्व राज्य सरकारानां व शहरातील हॉस्पिटलना मार्गदशक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा व ग्रामीण भागातील सर्पदंशाच्या घटनांची नोंद करावी त्यामुळे सर्वाधिक सपंदंश हेाणार्‍या जागांची निश्‍चित करता येईल आणि त्यावर उपचारासाठी पुरेसी लस उपलब्ध करून देता येईल, असे म्हंटले आहे.