होमपेज › Kolhapur › 25 लाख बिल काढण्यासाठी 3.5 लाख मागणारे दोघे जेरबंद

25 लाख बिल काढण्यासाठी 3.5 लाख मागणारे दोघे जेरबंद

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 12:59AM कोल्हापूर : प्रतिनिधी

टाकवडे (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे 25 लाखांचे अंतिम बिल काढण्यासाठी साडेतीन लाख रुपये लाचेची मागणी करणार्‍या शिरोळ पंचायत समितीच्या तत्कालीन अतिरिक्‍त उपअभियंत्यासह शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी अटक केली. अशोक महादेव कांबळे (वय 55, रा. पुणे), तुकाराम शंकर मंगल (54, नाळे कॉलनी, संभाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. उच्चपदस्थांसह दोघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

कांबळे यांना पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक चारमध्ये, तर मंगल यांना शिरोळ पंचायत समिती कार्यालयातून सायंकाळी ताब्यात घेण्यात आले, असे ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी सांगितले. संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारदाराचे मित्र असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाने सुमारे 3 कोटी 80 लाख रुपये खर्चाच्या टाकवडे येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा 2014 मध्ये ठेका घेतला होता. तथापि, वेळेअभावी संबंधित ठेकेदाराने करारपत्राद्वारे तक्रारदार असलेल्या व्यावसायिकाकडे कामाची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार वर्कआर्डर देण्यात आली होती. तक्रारदाराने झालेल्या कामाचे वेळोवेळी बिल सादर केल्यामुळे आजवर 3 कोटी 55 लाख रुपयांची पूर्तता झाली आहे. 

त्यानंतर उर्वरित 25 लाखांच्या कामाचीही व्यावसायिकाने 22 मार्च 2018 अखेर पूर्तता केली होती. त्यामुळे अंतिम बिलापोटी 25 लाख रुपयांची रक्‍कम मिळण्यासाठी तक्रारदाराने तत्कालीन उपअभियंता कांबळे, शाखा अभियंता मंगल यांच्याकडे पाठपुरावा केला होता.झालेल्या कामाचे मूल्यांकन करून एम.बी.लिहून घेऊन त्याची टाकवडे ग्रामपंचायतीकडे पूर्तता करण्याचीही विनंती संशयितांकडे करण्यात आली होती. परंतु, दोघेही अधिकारी त्यास टाळाटाळ करीत होते.

स्वत:साठी दोन लाख, वरिष्ठांसाठी दीड लाखाची मागणी संबंधित व्यावसायिकाने दि.24 एप्रिल 2018 रोजी टाकवडे येथे प्रत्यक्ष जाऊन मंगल यांची भेट घेतली असता, त्यांनी मूल्यांकनासाठी स्वत:ला दोन लाख रुपये, तर उपअभियंते कांबळे यांच्यासाठी दीड लाख रुपयाची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक गोडे, पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्याशी संपर्क साधून संशयिताविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने वेळोवेळी सापळा रचला. मात्र, सापळ्याची जाणीव झाल्याने कांबळे, मंगल यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्‍कम स्वीकारण्यास नकार दिला होता. 

‘एसीबी’ची एकाचवेळी दोन ठिकाणी कारवाई
प्रथमश्रेणीतील अधिकार्‍यासह दोघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाल्याने एसीबी पथकाने एकाचवेळी शिरोळ व पुणे येथे कारवाई करून कांबळे, मंगल यांना अटक केली. दोघांना अटक झाल्याची बातमी समजताच कार्यालयात सन्‍नाटा पसरला होता. वरिष्ठाधिकार्‍यांना काही दिवसापूर्वी लाचप्रकरणाची माहिती मिळाल्याने कांबळे यांची पुण्याला बदली करण्यात आली होती.

कोल्हापूर, पुण्यात घराची झडती
संशयितांना अटक झाल्याने कोल्हापूर (संभाजीनगर) येथील मंगल यांचे नाळे कॉलनीतील घर तसेच कांबळे यांच्या पुण्यातील घरावर रात्री उशिरा छापा टाकून तपासणी करण्यात आली. मंगल हे मूळचे आजरा येथील आहेत. तेथेही घराची तपासणी करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तपशील उपलब्ध झाला नव्हता.