Sun, Jun 16, 2019 13:10
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › थेट पाईपलाईनला लागणार आणखी दोन वर्षे

थेट पाईपलाईनला लागणार आणखी दोन वर्षे

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

काळम्मवाडी थेट पाईपलाईन योजनेंतर्गत 53 कि.मी.पैकी आतापर्यंत 33 कि. मी. लांबीच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. अजून डाव्या कालव्याच्या बाजूने बारा कि.मी. लांबीच्या पाईपलाईन टाकण्याचा खडतर प्रवास आहे. त्याबरोबरच काळम्मावाडी धरण अद्यापही भरलेलेच असल्याने धरण क्षेत्रातील जॅकवेलसह इतर कामांना वेळ लागणार आहे. त्यातच ठेकेदार कंपनीच्या वतीने अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. काही ठिकाणांच्या परवानगी मिळाल्यानंतरही ठेकेदार कंपनीच्या वतीने काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येते. एकूणच थेट पाईपलाईन योजनेतील अडचणी पाहता, काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

धरण क्षेत्रात पाण्यासाठी ‘इंटेक वेल’चे काम करण्यात आले; परंतु आता ते पाण्याखाली गेले आहे. 40 मीटर उंचीचा कॉपर डॅम बांधला असून पुन्हा पाण्याची अडचण होऊ नये यासाठी आणखी सहा मीटर उंची वाढवावी लागणार आहे. जॅकवेलमधील 33 मीटर म्हणजे सुमारे शंभर फूट पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. डाव्या कालव्याच्या बाजूने तब्बल 12 कि. मी. लांबीची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. प्रत्यक्षात तेथे वाहन जाण्यासाठीही जागा नाही. परिणामी, पहिल्यांदा तेथे रस्ता करून नंतरच पाईप न्याव्या लागणार आहेत.

पाईपलाईन टाकून पूर्ण झालेल्या एकूण 33 कि.मी.पैकी पुईखडी (कोल्हापूर) ते तुरंबेपर्यंतच्या सलग 28 कि.मी.च्या कामाचा समावेश आहे. सोळांकूर गावाजवळ साडेतीन कि.मी.चे काम थांबले आहे. वास्तविक ठेकेदार कंपनीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करून परवानगी मिळालेल्या ठिकाणांचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक होते. जॅकवेलची 33 मीटर खोदाई झाली असून, आणखी बारा मीटरचे काम राहिले आहे; मात्र ठेकेदार कंपनीचे काम निवांतपणे चालल्याचे दिसून येते. योजना पूर्ण करण्यासाठी मे 2018 डेडलाईन आहे; परंतु या कालावधीत काम पूर्ण अशक्य आहे. धरण क्षेत्र परिसरात वन्यजीव विभागाची जागा असल्याने तेथे सायंकाळनंतर काम करण्यास बंदी आहे. त्यामुळे सात ते आठ महिन्यांत चोवीस तास काम करून धरण क्षेत्रातील कामे पूर्ण होणे शक्य नाही.