होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या भगिनींकडून जवानांसाठी दोन लाख राख्या

कोल्हापूरच्या भगिनींकडून जवानांसाठी दोन लाख राख्या

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या देश रक्षाबंधन उपक्रमांतर्गत कोल्हापूरच्या भगिनींकडून 2 लाखाहून अधिक राख्या जमा झाल्या. गुरुवारी महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या वतीने बहीण अश्‍विनी तावडे यांच्या हस्ते मराठा बटालियनचे टी.ए.चे लेफ्टनंट तानाजी चौगुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. 

शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास शहीद पुंडलिक माने यांच्या आई ज्ञानुबाई माने व पिता केरबा माने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींनी जवानांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शहीद रावराणे, केरळ पूरपरिस्थितीत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना महापौर बोंद्रे यांनी छ. ताराराणींच्या नावे मुलींसाठी सैनिकी स्कूलसाठी कटिबद्ध राहू, असे सांगितले. सुभेदार एन. एन. पाटील यांनी गेल्या 19 वर्षांपासून उपक्रम राबवल्याबद्दल ट्रस्टचे आभार व्यक्त केले. स्वागत राजेंद्र मकोटे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष किशोर घाटगे यांनी केले. आभार सुखदेव गिरी यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. सायली कचरे, यशश्री घाटगे, महेश कामत आदी उपस्थित होते.

शहिदांचा अभिमान...

शहीद रावराणेंच्या भगिनी अश्‍विनी तावडे म्हणाल्या, माझा भाऊ सीमेवर शहीद झाला याचे दु:ख असले तरी आम्हा कुटुंबीयांना त्याचा अभिमान आहे. एकीकडे तरुण सीमेवर शहीद होत आहेत तर दुसरीकडे तरुण-तरुणी नशेत आपले जीवन संपवत आहेत. समाजातील ही स्थिती बदलली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुंडलिक माने यांच्या मातोश्री ज्ञानुबाई माने म्हणाल्या, मुलाच्या जाण्याचे दु:ख आहे, पण एक मुलगा शहीद झाला म्हणून काय झाले, देशरक्षणास गरज पडल्यास नातवंडांनाही सीमेवर पाठवायला कमी पडणार नाही.