Tue, Jan 21, 2020 12:13होमपेज › Kolhapur › दोन अपघातांत दोघे ठार

दोन अपघातांत दोघे ठार

Published On: Jul 24 2019 1:56AM | Last Updated: Jul 24 2019 1:56AM
कोल्हापूर / उजळाईवाडी : प्रतिनिधी 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडीजवळ पावसात झाडाखाली थांबलेल्या मोटारसायकलस्वारांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कॉलेज युवक जागीच ठार, तर दोघे जखमी झाले. दुसर्‍या अपघातात  मोटारीने ठोकरल्याने प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

पावसामुळे बचावासाठी मोटारसायकलस्वार झाडाखाली थांबले होते. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने किरण पिराजी पाटील (वय 20, रा. रेंदाळ ता. हातकणंगले) हा कॉलेज युवक जागीच ठार झाला. श्रीकांत चंद्रकांत चव्हाण व सुरेश गंगाराम डोंबे (दोघे रा.  पणुंद्रे, ता. शाहूवाडी) हे गंभीर जखमी झाले. कागलचे संजय दिलीप मर्दाने हे दैव बलवत्तर म्हणून कंटेनरने धक्का देऊनही बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुन्या जयहिंद धाब्याजवळ घडली. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव ठाण्यात करण्यात आली. 

गोकुळ शिरगाव एमआयडीसीपासून अचानक पाऊस आल्याने महामार्गावर बाजूला असलेल्या झाडाखाली सुमारे वीसजण थांबले होते. तीन वाजण्याच्या सुमारास कागलच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या बावीस चाकी कंटेनरने किरण पाटील याला चिरडले. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने तो शेजारील ओढ्यात जाऊन उलटला. या कंटेनरखाली सापडल्याने किरण पाटील याचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर श्रीकांत चव्हाण आणि सुरेश डोंबे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे कर्मचार्‍यांसह दाखल झाले.तसेच महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी आणि चार रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. त्यांनी जखमी चव्हाण आणि डोंबे यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात उपचारासाठी पाठविले. दोन क्रेनच्या सहाय्याने ओढ्यात उलटलेला कंटेनर उभा केला. तसेच कंटेनरखाली सापडलेला किरण पाटील याचा मृतदेह बाहेर काढला. किरण हा के.आय.टी. कॉलेज येथे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतमार्गे रेंदाळला चालला होता. जखमी चव्हाण आणि डोंबे मार्केट यार्डात कामास आहेत. 

घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अपघातग्रस्त कंटेनर बाहेर काढताना आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करताना पोलिस कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागली. चार क्रेनच्या सहाय्यानेही अपघातग्रस्त कंटेनर बाहेर काढता आला नाही. त्यामुळे तो तसाच ठेवला. या अपघातामुळे सुमारे तीन तास कागलकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी नंतर वाहतूक सुरळीत केली. 

आंबेवाडी चौकात अपघातात एकाचा मृत्यू

दुसरा अपघात कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर आंबेवाडी येथील भरचौकातील हॉटेलसमोर सोमवारी रात्री उशिरा घडला. मोटारीने ठोकरल्याने प्रयाग चिखली (ता.करवीर) येथील सागर विलास पवार (32, रा. सोनतळी) यांचा मृत्यू झाला तर रवींद्र अशोक माने (28, प्रयाग चिखली) यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले आहे.

करवीर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. सागर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पत्नीसह आई, वडिलांनी शासकीय रुग्णालय आवारात हंबरडा फोडला. सागर व साथीदार रवींद्र हे दोघेजण कोल्हापूरमधील फर्ममध्ये कामाला आहेत. सोमवारी रात्री ड्युटी संपवून दोघेही दुचाकीवरून गावाकडे परतत असताना हा अपघात झाला.