होमपेज › Kolhapur › केएमटी-मोपेड अपघातात दोघे ठार

केएमटी-मोपेड अपघातात दोघे ठार

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 1:47AMकागल ः प्रतिनिधी

कागल येथील बसस्थानकासमोरील पुलाजवळ सर्व्हिस रोडवर सायंकाळी केएमटी बस आणि जुपिटर मोपेडची समोरासमोर धडक होऊन जुपिटरवरील लक्ष्मण प्रकाश खोत (वय 27, रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले) व राकेश संजय बिराणे (22, रा. टाकवडे) यांच्या डोक्यावर केएमटीची मागील चाके गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. केएमटी बसचालक कृष्णात गणपती वरुटे (रा. दर्‍याचे वडगाव, वड्डवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केएमटी बस (एम.एच. 09 बीसी 2167) कागलहून कोल्हापूरला जाण्यासाठी बसस्थानकाजवळील बोगदा पास करून सर्व्हिस रोडवरून पुढे जात होती. लक्ष्मण प्रकाश खोत आणि त्याचा मित्र राकेश बिराणे हे दोघे जुपिटर (एम.एच. 09 ईव्ही 2637) वरून मुरगूड नाक्याकडून कागल शहरात येत असताना केएमटी बस आणि मोपेडची समोरासमोर धडक झाली. जोराची धडक बसल्यामुळे मोपेड बसच्या उजव्या चाकाला धडकून मागील चाकामध्ये मोपेडस्वार पडले. अपघाताच्या ठिकाणी रक्‍ताचा सडा पडला होता. अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

अपघातातील मृत लक्ष्मण खोत हा त्याचा मित्र राकेश बिराणे  याच्याबरोबर कागलमधील आपल्या नातेवाइकाकडे आला होता. त्यानंतर तो सांगावच्या बहिणीकडेही जाणार होता. जातानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. अपघातानंतर कागलमधील त्यांचे नातेवाईक कागल ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. राकेश बिराणे याचे वडील शेतात मोलमजुरी करतात, तर लक्ष्मण खोत हा शेती करतो. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील आहेत.