Wed, Feb 20, 2019 11:47होमपेज › Kolhapur › मलकापुरात दोन अर्भक मृतावस्थेत आढळली 

मलकापुरात दोन अर्भक मृतावस्थेत आढळली 

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:12AMमलकापूर : वार्ताहर

मलकापूर (ता. शाहूवाडी)  शहरातील भाजीमंडई शेजारील सार्वजनिक शौचालयाशेजारी अज्ञात व्यक्तीने सोडून दिलेली दोन अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिस निरिक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. 

मलकापूर नगरपालिकेचे सफाई कामगार सफाईसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास एक चार महिन्यांचे स्त्री जातीचे तर दुसरे सहा महिन्यांचे पुरुष जातीचे अशी दोन अर्भक मृतावस्थेत आढळून आली. सफाई कामगारांनी याबाबत शाहूवाडी पोलिस ठाण्यात कळवले. पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी आले. याबाबत सफाई कामगार आकाश दगडू चावर यांनी फिर्याद दिली आहे. 

दोन्ही अर्भक ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथे नेऊन त्यांची डी. एन.ए. चाचणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे पोलिसांतून सांगण्यात आले. या अर्भकाबरोबरच महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्यासदृश आढळून आल्याचेही सांगण्यात आले.  

दरम्यान, घटनास्थळी श्‍वानपथक पाचारण करण्यात आले होते. मात्र,  या घटनेचा माग लागला नाही.  याबाबत कोणास माहिती मिळाल्यास संबंधितांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन  रानमाळे यांनी केले आहे.दरम्यान, घटनास्थळी शाहूवाडी  विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी भेट दिली. याबाबत नगराध्यक्ष अमोल केसरकर म्हणाले की, हा प्रकार निंदनीय असून संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.