Fri, Apr 26, 2019 17:51होमपेज › Kolhapur › कळंबा तुरुंगातील दोन नक्षलवादी, अतिजहाल कैद्यांभोवती कडक बंदोबस्त

कळंबा तुरुंगातील दोन नक्षलवादी, अतिजहाल कैद्यांभोवती कडक बंदोबस्त

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMकोल्हापूर : दिलीप भिसे

दहशतवादी, नक्षलवाद्यांच्या चिथावणीखोर वक्‍तव्यांचा प्रभाव टाकून सामान्य कैद्यांची माथी भडकावण्याचा प्रकार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश जारी केला आहे. त्या आदेशानुसार कळंबा मध्यवर्ती कारागृहातील दोन नक्षलींसह अतिजहाल 12 कैद्यांच्या बंदोबस्तात आणखी कडक वाढ करण्यात आली आहे. आजन्म कारावास भोगणार्‍या, धोकादायक आणि जहाल कैद्यांना अंडासेलमध्ये हलविण्यात आले आहे. कारागृहातील अन्य कैद्यांशी संपर्क ठेवण्यावर त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

देशविघातक मार्गाने सामाजिक, राजकीय व्यवस्थेत बदल घडविण्याची इच्छा बाळगणार्‍या डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या जहाल गटाच्या कारवाया आता दहशतवादी कारवाया समजल्या जातील, असा कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित कायद्याच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून अभिप्राय मागविले आहेत. सद्यस्थिती लक्षात घेऊन धोकादायक, अतिजहाल कैद्यांवर अधिक कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

सर्व मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेत वाढ

मुंबई, पुणे, तळोजा, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील सर्व कारागृह प्रशासनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना लागू केल्या आहेत. कोल्हापुरात कळंबा कारागृहात खबरदारी घेऊन घातक, जहाल ठरलेल्या 12 कैद्यांच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. 

‘अंडासेल’वर सीसीटीव्हीची नजर

कडेकोट बंदोबस्त असलेल्या ‘अंडासेल’वर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवण्यात आली आहे. अंडासेल अंतर्गत बाराही बरॅकमध्ये 12 कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कारागृहातील अन्य कैदीच नव्हे, अंडासेलमधील अन्य कैद्यांशीही त्यांना संपर्कास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय कारागृहांतर्गत 34 सेलमध्ये 77 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

उच्च विद्याविभूषित तरुण बनला नक्षलवादी...

कुंजबरगाल (झारखंड) येथील उच्च विद्याविभूषित (एमएस्सी) 34 वर्षीय नक्षलीसह त्याच्या साथीदाराला आजन्म कारावास झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कनेक्शन उघड झाल्याने 2013 मध्ये अहेरी (गडचिरोली) पोलिसांनी त्याला अटक केली. नाशिक कारागृहातून सप्टेंबर 2017 मध्ये त्याला कळंबा कारागृहात हलविण्यात आले. शिवाय अतिजहाल कैद्यांना अन्य कारागृहातून येथे हलविण्यात आले आहे. त्यात काही कैदी गँगस्टर्स, विविध संघटनांशी संबंधित आहेत.