Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Kolhapur › बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धूमशान

बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धूमशान

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 15 2018 10:42PMमाजगाव : इंद्रजित शिंदे 

पन्हाळा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली  असून प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे. प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने  नागरिकांमध्ये उत्साह आहे. यापूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, प्रभागनिहाय आरक्षण प्रकिया सुरू झाल्याने निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष, स्थानिक गट-तट मोर्चेबांधणीला लागले असून इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

तालुक्यातील माजगाव, शिंदेवाडी, खोतवाडी, माळवाडी, देवठाणे, महाडिकवाडी, कसबा ठाणे, या गावांसह बोरीवडे, बादेवाडी, वेखंडवाडी, सुळे व कोदवडे या 12 गावच्या  ग्रामपंचायतीची  मुदत येत्या जून ते ऑगस्ट दरम्यान सपंत आहे. त्यामुळे येथील होऊ घातलेल्या ग्रा. पं. निवडणुकीच्या तयारीला प्रशासन लागले आहे. मार्चअखेर प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, प्रभागनिहाय मतदार यादी, हरकती कालावधी आदी कामांचा प्रारंभ तलाठी कार्यालयाकडून सुरू झाला आहे. मे अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. याची चाहूल स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना लागली आहे. यावेळी या गावातून पहिल्यांदाच थेट सरपंच निवड होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढवला आहे. काही जणांनी निवडून रिंगणात आताच शड्डू ठोकून सलामी दिली आहे.

तालुक्यात माजी मंत्री विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, माजी आमदार पी.एन पाटील यांचे प्रामुख्याने राजकीय गट आहेत. तसेच सेवा संस्था आणि दूध संस्थेच्या राजकारणातून स्थानिक पातळीवर काही राजकीय गटसुद्धा आहेत. नेत्यांच्या समोर 

आपली राजकीय पत वाढावी. त्याद‍ृष्टीने आजी-माजी जि. प. सदस्य, पं.स. सदस्य, आजी-माजी साखर कारखाना संचालक व स्थानिक नेते पडद्यामागून संभाव्य उमेदवारांची चाचपणी घेत आहेत. एकंदरीत येत्या मे-जून महिन्यात या गावामध्ये राजकीय वातावरण तापणार आहे.