होमपेज › Kolhapur › सेमिस्टर परीक्षा पद्धत बंद करा

सेमिस्टर परीक्षा पद्धत बंद करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील कला, वाणिज्य अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये सेमिस्टर पद्धतीने सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणाऐवजी परीक्षार्थी बनले आहेत. अभ्यासापेक्षा विद्यार्थी परीक्षेत अडकलेला आहे. त्यामुळे सेमिस्टर परीक्षा पद्धत बंद करून वार्षिक परीक्षा पद्धत सुरू करावी, हा ठराव शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेने मंगळवारी एकमताने   मंजूर केला. यासह निवृत्त प्राध्यापक ओमप्रकाश कलमे यांनी निवृत्तीनंतरही निवासस्थान (क्वाटर्स) सोडलेले नसल्याबद्दल सभेत अनेक सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली. खुल्या प्रवर्गातील पदांवर मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्‍नत करताना कोणत्या कायद्याचा आधार घेतला?, प्लेसमेंट सेल स्वतंत्र कार्यालय करा,  सामंजस्य कराराचा विद्यार्थ्यांना उपयोग काय? आदी मुद्द्यांवर प्रश्‍नोत्तराच्या तासात सदस्यांनी प्रशासनावर प्रश्‍नांची सरबत्ती करत प्रशासनाला धारेवर धरले. 

शिवाजी विद्यापीठ अधिसभेची वार्षिक बैठक मंगळवारी राजर्षी शाहू सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. देवानंद शिंदे तर सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि  प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.   कला, वाणिज्य अभ्यासक्रमांच्या सेमिस्टर पद्धतीने होणार्‍या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ही पद्धत बंद करावी, या सदस्य भैया माने यांच्या ठरावास अधिसभेत एकमताने मंजुरी दिली. खुल्या प्रवर्गातील पदावर एकूण 16 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे तर 29 जणांना अशा पदांवर पदोन्‍नती देण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबतचा प्रश्‍न सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी विचारला. याबाबत कोणत्या कायद्याचा आधार घेतला आहे याबाबत माहिती सदस्यांकडून प्रशासनाला विचारण्यात आली. 

खोटी बिले सादर करून प्रवासभत्ता लाटणार्‍या जे. एस. पाटील या अधिष्ठातावर कारवाई का केली नाही, असा प्रश्‍न अमरसिंग रजपूत यांनी उपस्थित केला. यावेळी संबंधित अधिष्ठातांकडून लावलेले जादा बिल वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  युरोपियन संस्थेसोबत सहकार्य प्रकल्पात भारतातील आठ संस्थांत शिवाजी विद्यापीठाचा समावेश असून, याचा  विद्यार्थ्यांचा फायदा काय झाला, असा प्रश्‍न भैया माने यांनी उपस्थित केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्लेसमेट सेलच्या माध्यमातून 5841 विद्यार्थ्यांना कंपन्यांनी नियुक्‍त केले असले तरी ही संख्या कमी असल्याचे प्रश्‍नांवर भविष्यात हा आकडा वाढेल असे प्रशासनाने सांगितले. तक्रार निवारण समितीकडे दाखल झालेल्या तक्रारी, वाय-फाय सेवेची वाढलेली गती यासह विविध प्रशासकीय कामकाजावर चर्चा झाली. विद्यापीठ प्रशासनातील रिक्‍त पदे तातडीने भरावीत व ज्यांना पदोन्‍नती द्यावयाची आहे त्यांना पदोन्‍नती देण्यात यावी, अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेस केली. सभेसाठी 16 लेखी प्रश्‍न विचारण्यात आले. परंतु, एक तासाच्या निर्धारीत वेळेत अकरा प्रश्‍नांवरच चर्चा झाली. 

यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य धैर्यशील पाटील, संजय जाधव, डॉ. बी. एन. गायकवाड आदींनी प्रश्‍नांबाबत खुलासा केला. सभेस परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले आदींसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

डॉ. कलमे यांच्यावर न्यायिक कारवाईची मागणी

सेवानिवृत्तीनंतर एक वर्षापासून अधिक काळ नो ड्युज सर्टिफिकेट घेतले नसलेल्या प्राध्यापकांबाबत डॉ. सतीश घाटगे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी डॉ. कलमे आणि डी. श्रीकांत या दोन प्राध्यापकांना नो ड्युज मागणी न केल्याने दिले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, semester, examination, method, annual, examination, method


  •