Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Kolhapur › तुळशी वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्ताव धूळखात?

तुळशी वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्ताव धूळखात?

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 10:49PMधामोड : रवींद्र पाटील

धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी प्रकल्पावरील 2007 सालचा नियोजित वीजनिर्मिती प्रकल्प का रखडला? याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पावसाचे वाढते प्रमाण व केळोशी येथील लोंढा नाला प्रकल्पातून येणारे पाणी व सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी वीजनिर्मितीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतानाही वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव गेली अकरा वर्षे धूळखात पडला आहे. 

तुळशी प्रकल्पामधून दरवर्षी बाहेर पडणारे सुमारे तीन टीएमसी पाणी प्रक्रियेविना वाया जात आहे. वाया जाणार्‍या पाण्यामधून सुमारे 30 ते 40 लाख युनिट वीज निर्मितीची क्षमता असतानाही पाटबंधारे विभाग व महाराष्ट्र शासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

धामोड येथील तुळशी मध्यम प्रकल्पावर बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या योजनेतून वीजनिर्मिती केंद्र (हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट) उभारणीसाठी 2007 साली निविदा भरण्यात आली होती. या निविदेचे प्रवर्तक श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्‍ती निर्माण संस्था लि., वारणानगर या संस्थेद्वारे काम सुरू होणार होते, पण तुळशी प्रकल्पास पाणी संचय क्षेत्र कमी असल्याने कित्येक वेळा प्रकल्प भरला नव्हता, या कारणामुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे वीजनिर्मिती प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे. 

तुळशी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने केळोशी बुद्रुक येथे बहुउद्देशीय लोंढा नाला प्रकल्प बांधण्यात आला असून हा प्रकल्प भरल्यानंतर त्यामधून बाहेर पडणारे पाणी तुळशी प्रकल्पात येत आहे. त्यामधून 2015 पासून दरवर्षी सुमारे एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी येत असून तुळशी प्रकल्प भरल्यानंतर सांडव्याद्वारे सुमारे एक ते दीड टीएमसी पाणी पावसाळ्यात वाया जात आहे. तुळशी प्रकल्पाची साठवण क्षमता 3.47 टीएमसी असून त्यामधून दरवर्षी सुमारे दीड ते दोन टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडले जाते. 

दरवर्षी पावासाळ्यात सांडव्याद्वारे वाहून जाणारे पाणी व सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी सुमारे दोन ते अडीच टीएमसी असून या पाण्याद्वारे वीज तयार केली तर सुमारे 30 ते 40 लाख युनिट वीज तयार होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे व प्रति युनिट 3 रुपये या दराप्रमाणे 9 कोटी रुपयांची वीज तयार होणार असून भविष्यातील विजेची मागणी व गरज पहाता तुळशी प्रकल्पावर वीजनिर्मिती केंद्र उभारणे काळाची गरज असून लोकप्रतिनिधी व शासनाने त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असून मार्च, एप्रिल, मेमध्ये औद्योगिक, घरगुती व सिंचनासाठी विजेची कमतरता भासते व वीज कपातीला सर्वांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाया जाणारी ऊर्जा वापरात येण्यासाठी सर्व प्रकल्पांवर वीजनिर्मीती केंद्र होणे गरजेचे आहे.     - आनंदराव टेपुगडे, माजी सरपंच, धामोड

तुळशी प्रकल्पावर वीजनिर्मिती केंद्र उभारण्यासाठी कुठलीही तांत्रिक अडचण नाही व जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून अशा प्रकल्पाचे स्वागत आहे.  - एस. ए. कळके (शाखा अभियंता, तुळशी प्रकल्प)