Fri, Apr 26, 2019 20:17होमपेज › Kolhapur › मंगळवार पेठेतील बालकाचा डेंग्यूने मृत्यू

मंगळवार पेठेतील बालकाचा डेंग्यूने मृत्यू

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात डेंग्यूचा विळखा अधिकाधिक घट्ट आवळला जात आहे. बुधवारी मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगसमोरील पुष्पा निवासमधील कर्तव्य सुमीत ओसवाल या दहा वर्षांच्या बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरातील हा तिसरा बळी आहे. गल्‍लीत सर्वांमध्ये लाडका असलेल्या कर्तव्यच्या निधनामुळे मंगळवार पेठ परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. 

कर्तव्य हा एका खासगी शाळेत 5 वीत शिकत होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याला ताप आला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. कर्तव्यच्या निधनाचे वृत्त समजताच त्याच्या घरातील सर्वांना धक्‍का बसला. कर्तव्यच्या अचानक जाण्याने त्याच्या आईने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहीण, आजोबा, आजी, चुलते असा परिवार आहे.

गेल्या आठवड्यात एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी शिवाजी पेठेतील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर आज, बुधवारी कर्तव्य ओसवाल या बालकाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. सरकारी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 300 वर आहे. तर खासगी रुग्णालयांत नातेवाइकांना बसायलाही जागा नाही, असे चित्र आहे. शहरातील काही घरांत  चार ते पाच सदस्य तापाने आजारी आहेत. एकीकडे डेंग्यूची साथ जोराने पसरत असताना स्वाईन फ्लूचेही संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धूर फवारणी व इतर उपचार करावेत, अशी मागणी होत आहे.