Wed, Nov 21, 2018 17:23होमपेज › Kolhapur › जयप्रभा स्टुडिओ सुरू करण्याच्या हालचाली

जयप्रभा स्टुडिओ सुरू करण्याच्या हालचाली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

चित्रीकरणासाठी बंद असलेला  जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सुरू व्हावा, यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या मध्यस्थीने प्रयत्न सुरू आहेत.  कोल्हापूर चित्रनगरीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सध्या चित्रीकरणासाठी एकही स्टुडिओ उपलब्ध नसल्याने जयप्रभा स्टुडिओ पुन्हा चित्रीकरणासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासन व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यात मध्यस्थी करून हा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न खा. संभाजीराजे करणार आहेत. 

मराठी चित्रपटांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली; पण नंतर ही कंपनी पुण्याला हलविण्यात आली. राजाराम महाराजांनी कोल्हापुरातील चित्रपट निर्मिती बंद होऊ नये, यासाठी बेलबाग येथील जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिली. कालांतराने भालजी पेंढारकर यांनी रितसर पैसे भरून करवीर संस्थानकडून जागा विकत घेतली. जयसिंग व प्रभाकर या आपल्या मुलांच्या नावांचे पहिले दोन शब्द घेऊन ‘जयप्रभा’ असे स्टुडिओला नाव दिले. गांधी हत्येनंतर हा स्टुडिओ जाळण्यात आला. पुन्हा स्टुडिओ उभारणे भालजी पेंढारकर यांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यातच बँकेचे कर्ज होते. तेव्हा लता मंगेशकर यांनी मदत केली. त्याबदल्यात भालजींनी स्टुडिओ त्यांच्या नावे केला.

2000 साली जयप्रभा स्टुडिओलगतची जागा लता मंगोेशकर यांनी विकसित करण्यासाठी दिली. त्यावेळी स्टुडिओच्या जागेची विक्री होऊ नये, यासाठी कोल्हापूरच्या जनतेने आंदोलन सुरू केले. एका बांधकाम व्यावसायिकाने स्टुडिओची जागा खरेदी केली होती; पण त्या बांधकाम व्यावसायिकाला हा व्यवहार रद्द करण्यास आंदोलकांनी भाग पाडले. अखेर साडेतीन एकर जागा स्टुडिओ चित्रीकरणासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचदरम्यान 2005 पासून या ठिकाणी चित्रीकरण बंद करण्यात आले.

आशा पल्‍लवीत...

कोल्हापूर महापालिकेने जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज (क) मध्ये केला आहे. सद्यस्थितीत येथे कोणतेही चित्रीकरण सुरू नाही. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांनी हा स्टुडिओ पुन्हा चित्रीकरणासाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चित्रपट व्यवसायाशी संबंधित काही संघटनांनी खा. संभाजीराजे यांना स्टुडिओ पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदन दिले आहे. मंगेशकर व शासन यांच्यात मध्यस्थी करून हा स्टुडिओ पुन्हा चित्रीकरणासाठी उपलब्ध व्हावा, अशी मागणी ते करणार आहेत. या चर्चेत यश आले तर जयप्रभा स्टुडिओ सुरू होण्याच्या आशा यानिमित्ताने पुन्हा पल्‍लवीत होणार आहेत.