Tue, May 21, 2019 00:43होमपेज › Kolhapur › उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू : डॉ. योगेश जाधव

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू : डॉ. योगेश जाधव

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेषत: आयटी पार्कला गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी दिली. 

कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या वतीने चेम्बरच्या शिवाजीराव देसाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद विकासासाठी’ या उपक्रमात जाधव बोलत होते. चेम्बर्सशी संलग्‍न सर्व संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनीही आपल्या व्यवसायाच्या समस्या मांडल्या.

उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांच्या काही समस्या समान आहेत, तर काही समस्या वेगळ्या आहेत. संलग्‍न संस्थांनी आपल्या समस्या संघटनानिहाय द्याव्यात, त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. ज्या समान समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंदर्भात संबंधितांशी आपण चर्चा करू, असे डॉ. जाधव म्हणाले.

गूळ हा कोल्हापूरचा जुना उद्योग आहे. या उद्योगावरच येथील उद्यमनगरी आकाराला आली आहे. कोल्हापूरला जे गूळ क्‍लस्टर मंजूर आहे, त्याच्यासमोरच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही डॉ. योगेश जाधव म्हणाले. 

कोल्हापूरला पर्यटनच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी नुकतेच हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. स्वत:हून पर्यटक येतात, ते राहिले पाहिजेत आणि विविध उत्सव, सण आणि इतर माध्यमातून टूर ऑपरेटर्समार्फत पर्यटक आले पाहिजेत. यासाठी रोड मॅप हॉटेल असोसिएशनमार्फत तयार केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.  

कोल्हापूरच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला हक्‍काचा माणूस मिळाल्याचे सांगून चेम्बरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी, विमानसेवा अखंडित सुरू राहावी, रेल्वेसेवेचा विस्तार करण्यात यावा, मंजूर असलेल्या गूळ क्‍लस्टरसाठी जागेचा प्रश्‍न सोडवावा, कोल्हापुरात आयटी पार्कसाठी राखीव असलेल्या जागेवर तो सुरू करावा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर सुरू करण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगितले.

हॉटेल असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर यांनी अंबाबाई नवरात्रौत्सव, जोतिबा यात्रा, नव्याने सुरू झालेले आडवाटेवरचे कोल्हापूर आणि साहसी खेळ हे सगळे उपक्रम पर्यटकांना वर्षभर आकर्षित करू शकतील. मात्र, त्याचे  मार्केटिंग करण्याची गरज असल्याचे सांगितले. विनोद कांबोज यांनी, टूर ऑपरेटरमार्फत कोल्हापुरात पर्यटनाला गती मिळावी, अशी सूचना करत, डेक्‍कन ओडीसी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

आयटी असोसिएशनचे अध्यक्ष ओेंकार देशपांडे यांनी, टेेंबलाई टेकडी येथे महापालिकेने आयटी उद्योगासाठी जी जागा राखीव ठेवली आहे, त्याचा उपयोग व्हावा, अशी मागणी केली. 

आनंद माने यांनी, कोकण रेल्वेच्या थांबलेल्या प्रकल्पाला आपण विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून गती द्यावी, अशी मागणी केली. प्रदीप कापडिया यांनी उद्योजक व व्यापारी यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मांडले. 

यावेळी डॉ. योगेश जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन ललित गांधी यांनी सत्कार केला. तर जाधव यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रदीपभाई कापडिया, ओंकार देशपांडे, उज्ज्वल नागेशकर, संजय पाटील, अतुल शहा, सचिन शानभाग, विनोद वाघवा, आर. जी. पाटील, शिवाजीराव पोवार, आशिष शहा, विनोद कांबोज, राजेंद्र शेटे यांचा समावेश होता.
संजय शेटे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन जयेश ओसवाल यांनी केले. धनंजय दुग्गे यांनी आभार 
मानले.

विमान व रेल्वेसेवेसाठी चर्चा करू 

कोल्हापूरला अखंडित विमानसेवा सुरू राहण्यासाठी मुंबईबरोबरच बंगळूर, हैदराबाद, तिरूपती विमानसेवा सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी व चेम्बरमार्फत जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्यासमवेत आपण असल्याचे सांगत डॉ. योगेश जाधव यांनी, रेल्वेसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आपण रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.