Sun, Mar 24, 2019 04:46होमपेज › Kolhapur › शेट्टींचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

शेट्टींचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्या मागण्या केल्याच नाहीत, त्या मान्य करून दूध दर आंदोलनात खासदार राजू शेट्टी यांचेच महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याला लोकसभा निवडणुकीची किनार असून त्यातून माजी मंत्री विनय कोरे यांनी केलेल्या मागण्या मान्य करताना त्यांना बळ देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. 

कर्नाटकसह इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शेट्टी यांनी 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. शेट्टी यांच्या या मागणीला पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी दूध संघांचा पाठिंबा आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) नेतृत्त्व भाजप आमदार अमल महाडिक यांचे वडील करतात. संचालक मंडळात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबा देसाई आहेत, तरी या आंदोलनाला गोकुळने पाठिंबा दिला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात माजी मंत्री विनय कोरे यांनी निर्यात दुधाला प्रतिलिटर पाच रुपये व पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. हीच मागणी काल विधानसभेत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मान्य करून शेट्टी यांची मागणी दुर्लक्षित केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा निर्णय मान्य नाही. त्यातूनत शेट्टी आंदोलनावर ठाम आहेत. सरकारसोबत फारकत घेतल्यानंतर संधी मिळेल त्याठिकाणी शेट्टी यांच्याकडून सरकारवर टीका सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात सद्यस्थितीत शेट्टी यांच्यात दोन्ही काँगे्रससह भाजपकडेही प्रबळ उमेदवार नाही. अशा परिस्थितीत कोरे यांना बळ देऊन त्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. या मतदारसंघात कोरे यांचे संस्थात्मक काम, त्यांच्या कारखान्याचे कार्यक्षेत्र या जमेच्या बाजू आहेत. या मतदार संघात जातीच्या राजकारणाला मोठे महत्त्व आहे. त्याद‍ृष्टीनेही कोरे यांची उमेदवारी महत्त्वाची समजली जाते. 

कोणत्याही परिस्थितीत शेट्टी यांना रोखणे हे भाजपसमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यातून दूध दर आंदोलनात कोरे यांनी केलेल्या मागण्या मान्य करून शेट्टी यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शेट्टी यांची दोन्ही काँगे्रसशी जवळीक वाढली आहे. लोकसभेला दोन्ही काँगे्रसची आघाडी निश्‍चित आहे, त्यात हातकणंगलेची जागा ही शेट्टी यांच्याशीच सोडली जाईल. त्याचा फायदा दोन्ही काँगे्रसला या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात होणार आहे. गेल्या दोन निवडणुकीतील शेट्टी यांचा या मतदारसंघातील उधळलेला वारू रोखण्यासाठीच त्यांच्या दूध दर आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते.