Mon, Jun 17, 2019 02:23होमपेज › Kolhapur › तोट्यातच करावा लागतो ट्रक व्यवसाय

तोट्यातच करावा लागतो ट्रक व्यवसाय

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 1:08AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

दररोज डिझेलचे दर वाढतात, टोलच्या दरातही वाढ होते; पण मालाची वाहतूक करणार्‍या  ट्रक वाहतूक भाडे दरात कोणतीच वाढ होत नाही. हा व्यवसाय करून आपला संसाराचा गाडा चालवताना ट्रक व्यावसायीकांना चांगलीच कसरत करावी लागते.  शेवटी जगण्याचा प्रश्‍नच गंभीर बनत चालल्याने अन्यायाला  वाचा फोडण्यासाठी ट्रकचालकांनी  देशव्यापी संपाची हाक दिली आहे. 

देशात वेगवेगळ्या राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रातील इंधनाच्या दराची स्थिती फारशी वेगळी नाही. ट्रकच्या व्यवसायात नफा राहू दे पण माल वाहतूक करताना मिळणार्‍या भाड्यातूनही खर्च भागवताना नाकीनऊ येत आहे. कोल्हापूरचा विचार करता  जिल्ह्यात  साखर कारखान्याची संख्या मोठी असून येथे उत्पादित होणार्‍या साखर व गुळाची मुंबई व अहमदाबाद येथे वाहतूक होते. याशिवाय औद्योगिक संस्थांमधूनही कच्चा व पक्क्या मालाची वाहतूक होते. कोल्हापूर जिल्ह्यात 16 हजार ट्रक आहेत. दररोज कोल्हापूर मुंबई मार्गावर विविध मालांची वाहतूक करणारे 2500 ट्रक तर कोल्हापूर अहमदाबाद  मार्गावर वाहतूक करणारे 2 हजार ट्रक धावतात. याशिवाय कर्नाटक, राजस्थान व गोवा या मार्गावरही दैनंदिन  दहा टन गूळ किंवा साखरेची वाहतूक करण्यासाठी टनावर मालाचे भाडे आकारले जाते.

सध्या 900 ते 1 हजार रुपये टन याप्रमाणे भाडे आकारणी केली जाते. त्याप्रमाणे 16 टनांसाठी 16 हजार रुपये आकारले जातात. ट्रकचे 3 ते 3.5 किलोमीटर अ‍ॅव्हरेज पकडता कोल्हापूर मुंबई या 450 किलो मीटर अंतरासाठी अंदाजे दीडशे लिटर डिझेल लागते. डिझेलच्या प्रति लिटर 70 रुपये दराप्रमाणे डिझेलसाठी साडे दहा हजार ते अकरा हजार रुपये खर्च येतो. यामार्गावर असणार्‍या टोलसाठी 2800 रुपये खर्च येतो. मालाची भरणी व उतरणी करण्यासाठी 2500 रुपये हा सर्व खर्च पकडता 16 हजार रुपये खर्च होतो. त्यामुळे ट्रक चालकांकडे एक रुपया शिल्‍लक राहत नाही अशी स्थिती आहे. 

सध्या मालाची वाहतूक करण्यासाठी टोल, मालाची भरणी व उतरणी, लागणार्‍या  डिझेलचा विचार करता 31  रुपये प्रति किलो मीटर  खर्च येतो.  खर्चावर आधारित हा दर 45 ते 50 रुपये प्रति किलो मीटर असावा, अशी मागणी ट्रक मालकांमधून होत आहे. टनाला किमान 1300 रुपये भाडे मिळावे, अशी मागणी भाडेवाढीच्या प्रस्तावात करण्यात येणार आहे. कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद  तसेच, राजस्थान  कर्नाटक व गोवा राज्यांमध्येही मालाची वाहतूक होते.

कोल्हापूर मुंबई मालवाहतुकीला सध्या 16 हजार रुपये भाडे आकारतात

डिझेल खर्च 10 हजार 500 रुपये 
टोल टॅक्स 2800 रुपये
मालाची भरणी-उतरणी 2500 रुपये
ड्रायव्हर भत्ता 700 ते 1 हजार          
ट्रकचा मेंटनन्स दहा टक्के 
एकूण 16000 रुपये