होमपेज › Kolhapur › आला इको-फ्रेंडली लग्‍नपत्रिकांचा ट्रेंड

आला इको-फ्रेंडली लग्‍नपत्रिकांचा ट्रेंड

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 28 2018 11:59PMपन्हाळा : राजू मुजावर

लग्‍न सराईत दिवसाला चार-पाच लग्‍नांची आमंत्रणं येतात... घरात पत्रिकांचा ढीग लागतो... लग्‍न झाल्यानंतर पत्रिकांचं काय करायचं? असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो. मात्र, आता लग्‍नपत्रिकांमध्येही इको-फ्रेंडली ट्रेंड रुजू लागला आहे. लग्‍नपत्रिकेचे स्वरूपच बीजपत्रिकेचे करून त्यातून सुंदर फूलझाड निर्मितीची संकल्पना पुढे आली आहे. नितीन बगाडे (मूळ-कोल्हापूर, सध्या-पुणे) यांनी त्यांच्या मुलाच्या लग्‍नपत्रिकेला बीजपत्रिकेचे स्वरूप देऊन पर्यावरणपूरक विवाहाचा आदर्श उपक्रम राबविला आहे. 

लग्‍न झाल्यावर पत्रिका फेकून न देता ती पाण्यात भिजवत ठेवून नंतर तो कागद कुंडीत ठेवला, तर त्यात एक सुंदर फूलझाड उगवते. काय भन्‍नाट कल्पना! नाहीतर लग्‍न सराईत पत्रिकांची घरात एवढी रद्दी जमते विचारू नका, पत्रिका एकतर जपून ठेवाव्या लागतात. फाडता येत नाहीत. कारण, त्यावर आपल्या देवी-देवतांची सुंदर चित्रे असतात, त्यामुळे आस्थेचा प्रश्‍न असतो. सध्या पूर्वीप्रमाणे पत्रिका येत नाहीत. खास निमंत्रणाच्या पत्रिकांत अक्षता, एखादी भेटवस्तू असा ऐवज असतो, अत्यंत महागड्या पत्रिका असतात. निमंत्रण दिले की, संपले काम पत्रिकेचे. ती पत्रिका मग घरात पडूनच राहते व त्याचा खर्च पण वाया जातो. या सर्वास फाटा देत बगाडे यांनी लग्‍नाच्या पत्रिकेच्या कागदातच फूलझाडांच्या बिया लपवल्या आहेत. पत्रिका पाण्यात चोवीस तास भिजवत ठेवायची व तो कागद नंतर कुंडीत ठेवायचा, या कुंडीत पाणी घालत राहायचे, कुंडीत एक फुलाचे सुंदर रोप तयार होते.

फूलझाड आनंद देत राहतं आणि पत्रिका इथे तिथे टाकून त्या पत्रिकेचा अवमान पण होत नाही, अशा पत्रिका इको-फ्रेंडली म्हणाव्या लागतील. पत्रिकेवर नितीन बगाडे यांनी तशी सूचना छापली आहे की, लग्‍नपत्रिका बीजपत्र कागदावर छापली आहे, ती पाण्यात चोवीस तास भिजवून कुंडीत कागद पुरा व पाणी घालत राहा, यातून तृण फुलांचे रोप तयार होईल.