Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Kolhapur › मुलींच्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर उपचार

मुलींच्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर उपचार

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 04 2018 11:37PM

बुकमार्क करा
गडहिंग्लज : प्रतिनिधी              

किशोरवयीन  मुलींमधील घटत्या हिमोग्लोबिनची केवळ चर्चा होते. मात्र, त्यावरील उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा फारच कमी ठिकाणी होताना दिसतो. गडहिंग्लज पंचायत समितीने मात्र यावर केवळ कागदोपत्री काम न करता ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यात एकूण 7 हजार 792 मुलींची हिमोग्लोबीन तपासणी केली. यामध्ये धोक्याच्या पातळीवर असलेल्या 3 हजारांपेक्षा अधिक मुली आढळल्या. त्यांचे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पुन्हा शिबिरे घेण्यास प्रारंभ केला असून यामध्ये औषधोपचारासह आहाराबाबत जागृती करण्याचे नियोजन केले आहे.

गेल्या महिन्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती जयश्री तेली यांनी आपल्या सहकारी सदस्यांच्या सहकार्यातून तालुक्यात सर्व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी केली होती. यामध्ये 8 मिलीग्रॅमपेक्षा पेक्षाही कमी हिमोग्लोबीन असलेल्या मुली आढळल्या. त्यामुळे त्यांच्यावर उपचारासाठी सभापती तेली यांनी याबाबत पुन्हा अधिकार्‍यांची बैठक घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे नियोजन केले. यानुसार या सर्व मुलींना हिमोग्लोबीन वृद्धीच्या गोळ्या देण्याबरोबरच पालकांसोबत आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हलकर्णीमध्ये 8 जानेवारीस हिमोग्लोबिन जागृती शिबिरांचा प्रारंभ होणार आहे. 9 रोजी सिम्बायोसीसमध्ये तर 10 रोजी महागावमधील बाजारकट्टा येथे, 12 रोजी कडगावमध्ये, 18 रोजी नेसरीमध्ये तर 20 रोजी तेरणी येथे ही शिबिर होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध पदाधिकारी या शिबिरास उपस्थित राहणार आहेत.

सभापती तेली म्हणाल्या, मुलींमधील हिमोग्लोबिन वृध्दीसाठी  गडहिंग्लज पंचायत समितीने जागृतीचा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. केवळ कागदोपत्री तपासणी करून आकडेमोड न करता या हिमोग्लोबिन घटलेल्या मुलींच्या पुढील उपचारासाठी कामकाज सुरू केले आहे. यामधून हिमोग्लोबिनच्या समस्येवर मात करता येईल. संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारे उपक्रम राबवणारी गडहिंग्लज पंचायत समिती एकमेव असेल, असा विश्‍वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. या पत्रकार परिषदेला गटविकास अधिकारी सीमा जगताप, उपसभापती बनश्री चौगुले, सदस्य विद्याधर गुरबे, श्रेया कोणकेरी, इंदुताई नाईक, डॉ. आंबोळे, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे, रमेश कोरवी आदी उपस्थित होते. 

1712 मुलींचे हिमोग्लोबिन 8 मिलीग्रॅमपेक्षा कमी 

हिमोग्लोबिन तपासणीमध्ये 8 मिलीग्रॅमपेक्षा कमी असलेल्या 1 हजार 712 मुली आढळल्या तर 9 ते 10 मिलीग्रॅमच्या दरम्यान 2 हजार 253 मुलीं असल्याचे तपासणी मोहिमेत आढळले आहे.