होमपेज › Kolhapur › पोलिस संरक्षणात होणार आता जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

पोलिस संरक्षणात होणार आता जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:51AMकोल्हापूर : अनिल देशमुख

संप, आंदोलनप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या समितीला संप, आंदोलन काळात दररोज बैठका घेऊन प्रवासी, मालवाहतुकीची गैरसोय होणार नाही, याचे नियोजन करावे लागणार आहे. अशा कालावधीत यापुढे जीवनावश्यक वस्तूंची पोलिस संरक्षणात वाहतूक करण्याचा निर्णयही  घेतला आहे.

शुक्रवार, दि. 20 पासून मालवाहतूकदार संपावर जात आहेत. राज्यात या संपाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी अशा आंदोलन, संप काळात जिल्हा पातळीवरील परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी जिल्हास्तरीय समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी  समितीचे अध्यक्ष  असून, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्‍त अथवा त्यांचे उपअधीक्षक, उपायुक्‍त दर्जापेक्षा कमी नसलेले प्रतिनिधी, जिल्हा  उपनिबंधक, एस.टी.चे विभाग नियंत्रक, होमगार्डचे जिल्हा समादेशक आणि प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असे सात सदस्य या समितीत असतील.

संप कालावधीत या समितीला दररोज बैठक घ्यावी लागणार आहे.  जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल दररोज सकाळी 10 आणि सायंकाळी 6 वाजता राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे. संप कालावधीत 24 तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणार आहे. जे संपात सहभागी होणार नाहीत, त्या वाहतूकदार, व्यावसायिक यांना संरक्षण द्यावे, जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याकरिता अशा वस्तूंची वाहतूक पोलिस सरंक्षणात करावी, असेही आदेश या समितीला देण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी शासकीय वाहनांचा वापर करावा, प्रसंगी खासगी वाहनेही अधिग्रहित करावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजीपाला, जीवानावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेचाही वापर करावा. त्याकरिता संबंधित अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात राहा, अशा सूचनाही राज्य शासनाने दिल्या आहेत.