Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Kolhapur › शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वाजले बिगुल

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वाजले बिगुल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

बहुतांश शिक्षकांनी विरोध केल्याने रखडलेल्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे बिगुल अखेर वाजले आहे. जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची चार गटांत मॅपिंग प्रक्रिया सुरू झाली असून, 31 मार्चअखेर बदलीपूर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

वारंवार एकाच शाळेत अध्यापनाचे कार्य करणार्‍या शिक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार बदली करणे, त्यांना सुगम, दुर्गम अशा ठिकाणांवरून बदली करून अध्यापनातील तोचतोपणा टाळणे यासाठी शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांना सुगम आणि दुर्गम अशा ठिकाणी समान संधी देण्यासाठी अंतर्गत जिल्हा बदलीची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया गेल्या डिसेंबर महिन्यात पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली होती; पण बदलीपात्र शिक्षकांनी विराट मोर्चाने केलेल्या विरोधामुळे ही प्रक्रिया राज्यपातळीवरून स्थगित करण्यात आली.

त्यामुळे बदली विरोधकांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते. तर बदली समर्थक शिक्षकांच्यात नाराजी पसरली होती. यामुळे बदली विरोधकांच्या विराट मोर्चानंतर दुर्गम शिक्षक तथा बदली समर्थक शेकडो  शिक्षकांनीही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक, सीईओ कुणाल खेमनार यांनी जिल्हांतर्गत बदली करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिल्यानंतर दुर्गम शिक्षकांचे हे उपोषण मागे घेण्यात आले. 

दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून या बदली प्रक्रियेबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्‍त होत होते. बदली विरोधक शिक्षकांच्या मोर्चानंतर बदली होणारच नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे दुर्गम शिक्षकांच्यात मात्र धास्ती उडाली होती. जर बदली झाली नाही, तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका या शिक्षकांनी संबंधित अधिकार्‍यांपुढे मांडली होती. दरम्यान, दि. 23 पासून समानीकरणासाठी रिक्‍त ठेवावयाच्या जागा, निव्वळ रिक्‍त जागा, शाळानिहाय बदली पत्र व बदली अधिकारप्राप्‍त शिक्षकांची संख्या ट्रान्स्फर पोर्टलवर भरणे व या माहितीची पडताळणी करण्याचे काम 26 तारखेपर्यंत सुरू होते. तर 26 पासून बुधवार (दि. 28) पर्यंत मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासोबतच 31 मार्चअखेरपर्यंत सेवा ज्येष्ठता याद्याही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे 31 मार्च अखेरपर्यंत जिल्हांतर्गत बदलीची पूर्वतयारी पूर्ण होणार आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात एकूण 8,500 शिक्षक असून या सर्व शिक्षकांचे मॅपिंग चार गटांत होणार आहे. पहिल्या गटात ज्यांची सेवा 53 वर्षे आहे, तसेच जे गंभीर आजारी आहेत, अशांचा समावेश आहे. तर दुसर्‍या गटात पती-पत्नी, तिसर्‍या गटात 3 वर्षे सेवा पूर्ण व चौथ्या गटात 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांचा समावेश आहे. यानुसार वर्गवारी करण्यात येणार आहे. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Transfer,  teachers, seniority


  •