Sun, May 26, 2019 08:43होमपेज › Kolhapur › १२ वी परीक्षेला भाषा विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेचे रुपांतर कृतिपत्रिकेत!

१२ वी परीक्षेला भाषा विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेचे रुपांतर कृतिपत्रिकेत!

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:01AMमुरगूड ः प्रतिनिधी 

फेब्रुवारी 2019 च्या बोर्डाच्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी भाषा विषयांसाठी आता प्रश्‍नपत्रिके ऐवजी कृतिपत्रिका येणार आहे. कृतियुक्‍त अभ्यासामुळे वर्गातील उपस्थितीला महत्त्व येणार आहे. कृतीमुळे घोकमपट्टी बंद होणार आहे. कृतिपत्रिकांवर आधारित अभ्यासामुळे स्मरणशक्‍तीला फाटा तर आकलनशक्‍तीवर भर दिला जाणार आहे.

अभ्यास व परीक्षा मंडळाने चालू वर्षी प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप बदलून कृतीपत्रिका तयार करण्याचे धोरण अवलंबले आहे. प्रथम मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू यांसारख्या भाषा विषयाच्या प्रशपत्रिकेऐवजी  कृतिपत्रिका येणार आहे. हा बदल गेल्या वर्षी इयत्ता अकरावीला करण्यात आला होता.

कृतिपत्रिकेमध्ये स्मरणशक्‍ती ऐवजी आकलनशक्‍तीला वाव देण्यात आला आहे. त्यामुळे वर्गातील  अध्यापनावर आधारित आकलनाद्वारे प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत. या कृतिपत्रिकेत स्मरणशक्‍ती ऐवजी आकलनशक्‍तीला महत्त्व देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आकलन करून प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत.

नवीन कृतिपत्रिकेमुळे दांड्या बहाद्दर विद्यार्थ्यांना चाप बसणार आहे. तसा कॉपीलाही आळा बसणार आहे. कृतिपत्रिका यावर्षी 80 अंकाची तर पुढील वर्षापासून शंभर अंकाची असणार आहे.या बदलाव कृतिपत्रिके संदर्भात संपूर्ण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा विषयाच्या प्राध्यापकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. पुढील शैक्षणिक वर्षापून पाठ्यक्रमही बदलला जाणार आहे. तो कृतियुक्‍त अध्यापनावर आधारित असणार आहे. यात शंभर गुणाच्या कृत्यांचा प्रश्‍नांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.