Mon, Mar 25, 2019 09:30होमपेज › Kolhapur › पर्यटकांमुळे शहर हाऊसफुल्‍ल

पर्यटकांमुळे शहर हाऊसफुल्‍ल

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 11:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

उन्हाळी सुट्ट्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील  पर्यटकांनी रविवारी (दि. 27 ) शहरात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. देवदर्शनानंतर पर्यटकांनी ऐतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पन्हाळा गडावर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची तारांबळ उडाली. शहरासह पन्हाळा रोडवर पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले. 

अंबाबाई मंदिरात व दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी भक्‍तांची रांग दिवसभर लागली  होती.  प्रेक्षणीय स्थळे आणि देव दर्शनानंतर पर्यटकांनी कोल्हापुरी चप्पल, साज, गूळ, खरेदी करत कोल्हापुरीभेळ, मिसळसह खास कोल्हापूर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. न्यू पॅलेस, रंकाळा, पंचगंगा घाट, कणेरीमठ, भवानी मंडप, टाऊन हॉल येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती. बिंदू चौकातील पार्किंग फुल्‍ल झाल्यामुळे पर्यटकांनी रस्त्यांच्याकडेलाच वाहने पार्किंग केली होती. बिनखांबी मंदिर ते पापाची तिकटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप, बिंदू चौक कमान परिसरात भाविकांनी वाहने पार्किंग केली होती.  यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांसह स्थानिकांनाही सहन करावा लागला.

पावसामुळे पर्यटक भाविकही सुखावले. 

शहरवासियांसह पर्यटकांनाही सकाळपासून उन्हाचा कडाका सहन करावा लागला. मात्र दुपारनंतर झालेल्या पावसामुळे भाविक पर्यटक सुखावले. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होतो. या पावसामुळे पर्यटकांची मात्र तारांबळ उडाली.