होमपेज › Kolhapur › खंडणीसाठी व्यापार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न

खंडणीसाठी व्यापार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:26AMइचलकरंजी : प्रतिनिधी

एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी रामकृष्ण रामप्रताप बाहेती (वय 39, रा. नाकोडानगर) यांचे अपहरण करण्याचा धक्‍कादायक प्रकार येथे घडला. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री 12.15 च्या सुमारास नाकोडानगर येथे घडली. पेठवडगाव रस्त्यावर हातकणंगले पोलिसांची गस्तीची गाडी पाहून अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना तिथेच सोडून धूम ठोकली. या पाच जणांनी बाहेती यांच्याकडून 3 तोळ्यांचे चेन, 2 तोळ्यांची अंगठी व 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे 1 लाख 70 हजारांचा ऐवज काढून घेतला. 

रामकृष्ण बाहेती यांचा निरामय हॉस्पिटलसमोर आदित्य गारमेंटस् नावाचा रेडिमेड कपडे निर्मितीचा कारखाना आहे. सोमवारी रात्री 9 वाजता गारमेंटमध्ये संगणक दुरुस्ती करण्यासाठी कबनूर येथील मकरंद कुलकर्णी आला होता. सॉफ्टवेअर मारण्याचे काम रात्री 12 च्या सुमारास संपले. त्यानंतर बाहेती हे मोपेड (क्र.एम.एच. 09 डीके 7137) वरून घरी निघाले. 12.15 च्या सुमारास नाकोडानगर कॉर्नरवर चंदेरी रंगाची इंडिका कार बाहेती यांच्या समोर येऊन थांबली. गाडीतून दोघेजण उतरून बाहेती यांना मारहाण केली. यावेळी लोटस मंदिरकडून आलेल्या दोघानींही बाहेती यांना मारहाण केली. यावेळी बाहेती यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यातील एकाने खुरप्याने बाहेती यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर वार केला. दरम्यान, त्यातील दोघांनी बाहेती यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले. 

ही कार सुसाट वेगाने निरामय हॉस्पिटल, सीईटीपी चौक, नारायण मळा, शहापूर रोड मार्गे कोरोची येथील तीन विहिरीच्या मार्गाने हातकणंगलेकडे नेली. त्यानंतर चालकाने गाडी हातकणंगले, कुंभोज मार्गे पुन्हा हातकणंगलेत आणली. यावेळी अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना धमकावून मुलाकडून 1 कोटी रुपयांची मागणी केली अन्यथा जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. याचवेळी एकाने सोनसाखळी, मोबाईल, अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर गाडी पेठवडगावच्या दिशेने वळवण्यात आली. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीतून बाहेती यांना उतरविले. 1 कोटी रुपये न दिल्यास पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी हातकणंगलेकडून रात्र गस्तीची पोलिस गाडी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तेथून धूम ठोकली. बाहेती यांनी पोलिस गाडीला थांबवून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हातकणंगले पोलिसांनी बाहेती यांना वडगाव पोलिस ठाण्यात नेले. 

यावेळी बाहेती यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी तातडीने वडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. वडगाव पोलिसांच्या मदतीने बाहेती यांना गावभाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी बाहेती यांनी दिलेली फिर्यादीनुसार पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नाकोडानगरपासून शहापूर मार्गावरील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातील संशयीत गाड्यांची माहिती घेण्याचे काम सुरू होते. अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी कोल्हापूर, इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण व गावभाग पोलिस ठाणे अशी तीन पथके रवाना केली आहेत. बाहेती यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे. पोलिसांकडून 11 ते 1 च्या दरम्यान झालेल्या मोबाईलचा डाटा एकत्रित करण्याचे कामही सुरू आहे. तसेच रेकॉर्डवरील संशयीतांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.