Sat, Mar 23, 2019 18:10होमपेज › Kolhapur › कापूरकडा धबधब्याला पर्यटकांची पसंती

कापूरकडा धबधब्याला पर्यटकांची पसंती

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 07 2018 11:24PMपाटपन्हाळा : वार्ताहर

नागमोडी वळणे घेत जांभळी नदीशी स्पर्धा करत गेलेला रस्ता... दोन्ही बाजूंनी दुभंगलेल्या हिरव्यागार डोंगररांगा... त्यावर डुलणारे गवत...गळ्यातील घंटानाद करत चरणारी काळीभोर जनावरे...पावसाचा झिम्माड, सुसाट वेगाने अंगाला झोबणारा वारा, खळखळत वाहणारे निर्झर...पक्ष्यांचा खिलबिलाट व वनखात्याचे घनदाट जंगल...निळ्याभोर आकाशातून रंगसंगती करणारं पांढर शुभ्र  धुक.. काळ्याकुट खडकावरून दुग्धवर्षाव करणारे धबधबे.. असा नयनरम्य निसर्गाचा अद्भूत आविष्कार जांभळी खोर्‍यात पाहायला मिळत असल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरणार असून वाशी (ता. पन्हाळा) कापूर कड्याच्या धबधबा परिसराकडे पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे.

कोल्हापूर रंकाळा स्थानकापासून अवघ्या 45 कि. मी. अंतरावर पश्‍चिम पन्हाळ्यातील शेवटच्या टोकाला जांभळी खोर्‍यात वाशी गाव आहे. गावातून सरासरी दोन कि.मी. अंतराची    कापूर कड्याकडे जाण्यासाठी पायवाट असून निसर्गाचा मनमुराद आनंद लूटत पायी जाता येते. साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा  पायी  प्रवास केला की वनखात्याच्या कृपेने बहरलेल्या हिरव्यागार   व एकमेकांशी स्पर्धा करत आकाशाला गवसणी घालणार्‍या वृक्षसंपत्तीच्या छत्रछायेत प्रवेश होतो.  वेगाने घोगावत येणारा वारा शरीराला थडकताच मनाला प्रसन्नता वाटते. मन वार्‍यावानी हेदकाळे खात निसर्गाच्या कुशीत लपेटून जाते.  

कड्याकपारीच्या खाद्यावरून  खळखळत  वेगाने वाहणार्‍या निर्झराच्या व पक्ष्यांच्या किलबिलाट आवाजाने जणू काय स्वर्गातील अप्सराच्या मैफिलीत असल्याचा भास होतो. तांबड्या  मातीतून वाट करत बाहेर झेपावणार्‍या कोवळ्या व हिरव्यागार गवतांच्या झुबक्यांवर  पाय पडताच  ‘जरा हटके’ डान्स करणेसाठी शरीर नाही  थरकलं तर नवलच. तर या परिसरात मन पूर्ण निसर्गाच्या  कुशीत चिंब  भिजुन जाते.  जीवनाला  निसर्गावानी मुक्तपणे व बिनधास्त जगण्याची ऊर्जा मिळते. निसर्गाच्या आविष्काराने  वेडे झालेल्या मनाला कापूर कड्यातून धबधबा अंगावर झेपावत असल्याचा भास होतो.  धबधब्याच्या तुषाराने शरीरातून धावणार्‍या घामाच्या धारांना स्पर्श झाल्यावर मनाला तृप्ती मिळते. हा विलक्षण अनुभव पर्यटकांना आपल्या वर्षासहलीत मिळालेली अस्सल मेजवानी ठरते.

निसर्गाशी गप्पा मारत विविध जातीच्या वृक्षवल्लींशी संवाद साधताना निसर्गवेड्या  पर्यटकांना घड्याळाचा तास काटा उजव्या बाजूने किती वेळात खाली झुकला याचाही अंदा राहत नाही. त्यामुळे परतीचा मार्गासाठी ठरवलेली वेळ निघून जाते. वनौषधी झुडपे, विविध जातींचे पक्षी , शेतकर्‍यांची झोप उडवून देणारा  गवा यांचे दर्शन नक्कीच होते. त्यामुळे कापूर कड्यातील धबधबा व जांभळी खोर्‍यातील निसर्ग सौदर्य पाहिल्यावर  येथे येणेसाठी  वर्षासहलीचे आयोजन पुन्हा - पुन्हा केल्या शिवाय मन स्वस्त बसू देणार नाही.

जांभळी खोर्‍यात येण्यासाठी बाजार भोगाव पासून पडसाळी व वाशी या दोन्ही मार्गांचा वापर करता येतो. वाहतुकीची मोठ्या प्रमाणात सोय नसल्याने स्वत:च्या वाहनांनी पर्यटकांना येणे फायदेचे ठरते. हॉटेल नसली तरी ग्रामीण पद्धतीचं कमी किमतीत शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळू शकते. यामुळे इकडे पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने पर्यटन व्यवसायही बहरत आहे.