Thu, Apr 25, 2019 04:14होमपेज › Kolhapur › चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार; एकाला अटक

चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार; एकाला अटक

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 22 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन युवतीला बळजबरीने लॉजवर नेऊन अत्याचार करणार्‍या दौलतनगर येथील तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अरविंद महादेव वडर असे त्याचे नाव आहे. पीडित युवतीच्या कुटुंबीयांना धमकी देऊन दहशत माजविण्यार्‍या संशयिताच्या बापालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.

संशयित व त्याच्या कुटुंबीयांच्या दहशतीमुळे भेदरलेल्या पीडित युवतीच्या आईने राजारामपुरी येथील काही सामाजिक संघटनांचा आधार घेत राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. 
लैंगिक अत्याचाराची फिर्याद दाखल होताच संशयित, त्याचे वडील महादेव कल्लाप्पा वडर (वय 50, रा. दौलतनगर) याना अटक करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, गरीब घरातील; पण अभ्यासात हुशार, बारावीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सतरा वर्षीय युवतीचा अरविंद चार-पाच महिन्यांपासून पाठलाग करीत होता. कॉलेजला येता-जाता तरुणीला रस्त्यात अडविणे, चेष्टा-मस्करी करीत असे. कालांतराने छेडछाडीसह एकतर्फी प्रेमातून त्याने धमकीचे तंत्र अवलंबिले. 

मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून शहराबाहेर फेरफटका मारणे, यासारखी कृत्ये तो करू लागला. चाकूचा धाक दाखवून त्याने दोन-तीनवेळा युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचे पीडित युवतीच्या आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, असे  पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. तरुणाच्या कृत्याची युवतीने आईसह अन्य नातेवाइकांना माहिती दिली. मात्र, त्यांच्यावर दहशतीचा अवलंब  झाल्याने कुटुंब हतबल झाले होते.

काही दिवसांपूर्वी तरुणाच्या वडिलाने पीडित युवतीच्या घरी येऊन मुलाबरोबर मुलीचे लग्न लावून न दिल्यास तिला घरातून पळवून देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार अरविंद व त्याचे वडील महादेव याला सकाळी पोलिसांनी अटक केली, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.