Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Kolhapur › युवतीचे अपहरण करून अत्याचार : एकास अटक

युवतीचे अपहरण करून अत्याचार : एकास अटक

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अल्पवयीन युवतीचे अपहरण करून दोन महिने लैंगिक अत्याचार करणार्‍या शाहूनगर येथील तरुणास राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. दीपक बाबुराव शिंगाडे (वय 22) असे त्याचे नाव आहे.शिंगाडेला मदत करणार्‍या नातेवाइकांसह साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

महाविद्यालयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने दि. 24 जुलैला सकाळी राजारामपुरीतून तिचे अपहरण केले होते. युवतीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयितासह नातेवाइकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. कोल्हापूरसह जयसिंगपूर, इचलकरंजी, कबनूर, बेळगाव परिसरात शोध घेण्यात आला. मात्र युवतीसह संशयिताचा छडा लागला नव्हता.

कबनूर (ता. हातकणंगले) परिसरात संशयिताने युवतीला खोलीत ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली. पोलिसांनी खोलीवर छापा टाकून युवतीसह शिंगाडेला ताब्यात घेतले. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. युवतीच्या संतप्त नातेवाइकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. फरारी काळात संशयिताचे इचलकरंजी, आदमापूर, बेळगाव येथे वास्तव्य असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. सीपीआरमध्ये युवतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

अपहरण, लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला मदत करणार्‍या नातेवाइकांसह साथीदारांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले. संशयित राजारामपुरी येथील एका फायनान्स कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला होता. ओळखीचा गैरफायदा घेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.  त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.